माऊलींचे पहिले गोल रिंगण बुधवारी दुपारी अलोट वारकऱयांच्या साक्षीनं झालं..माऊलींच्या पालखीच्या अश्वानं तीन फेऱया पूर्ण करून लाखो वारकऱयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले...
वारीच्या वाटेवर हा सोहळा अविस्मरणीय असतो. अनेकदा वारी करणाऱायंनाही या सोहळ्याची ओढ असते.
बुधवारी दुपारीही ही ओढ प्रत्येक वारकऱयांमध्ये जाणवत होती.
Labels: सोलापूर
न्याहरीची रंगत....
सकाळी बरडहून पालखी सोहळा निघाला. हा परिसर तसा दुष्काळीच. काटेरी बाभळी, झाडेझुडपांचा इथे सुकाळ. लोकसंख्या अडीच तीन हजार. वारकऱ्यांचा महासागर लोटल्यानंतर गावाचा चेहरामोहराच बदलून गेला होता. सारं गाव भक्तीसागरात डुंबत होतं. आणि भल्या पहाटेच या सागराला ओहोटी लागली आणि एकएक प्रवाह दिंडी रुपात पुढं सरकू लागला. सकाळच्या टप्प्यात वातावरणात गारवा होता. नऊनंतर मात्र, उन्हाचा चांगलाच चटका लागत होता. वाऱ्यामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास वारकऱ्यांना होत होता. मात्र, गारवा मनाला उभारी देत होता. नऊच्या सुमारास माऊली साधुबुवांच्या ओढ्याजवळी मंदिरात थांबली. आणि चालणारे वारकरी उजाड रानमाळावर विखुरले. येथे संपतमहाराज कुंभारगावकर यांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना बाजरीची भाकरी अन् तिखट आमटी दरवर्षी दिली जाते. या आमटीची चव काही न्यारीच असते. बाजरीच्या भाकरीचा हाताने भुगा करून पितळी (ताटात) ओतलेली आमटी कालवून फुरका मारीत रंगणारा हा रानभोजणाचा आगळावेगळा अनुभव याठिकाणी येतो. काटेरी झुडपांच्या आडोशाला आधार घेऊन दिंड्या न्याहारीच्या कार्यक्रमाला विसावल्या होत्या. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने आल्हाददायक वातावरणातील वाटचाल सुखकारक वाटत होती. भगव्या भक्तीचं हे वारकऱ्याचं गाव नाचत गात पुढं सरकतं होतं. पताका वाऱ्यावर फडफडत होत्या. टाळमृदगाच्या निनादानं अवघा आसमंत दणाणून गेला होता. दक्षिणेला शिंगणापुराच्या महादेवाचा डोंगर दिसत होता.
चिंकाराची चर्चा....
करीत निघालेल्या या सोहळ्यात वनमंत्री बबनराव पाचपुते सपत्निक चालत होते. आजूबाजूला वनकर्मचाऱ्यांची मांदियाळी होती. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत वन अधिकारी पाचपुतेंना सामोरे आले. एक हार माऊलींसाठी तर दुसरा हार मंत्र्यासाठी तयार होता. धर्मपुरीजवळ सोलापूर हद्दीत पालकी सोहळा प्रवेश करणार होता. परंतु त्याअगोदर वनमंत्र्याचं जंगी स्वागत केलं. आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सायबाचं कौतुक करायला मिळाल्याचं समाधान कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर तरळलं होत. एवढ्यात सोहळ्याबरोबर चालणाऱ्या पत्रकारांचा जथ्था आल्याचं दिसतात. वनमंत्री थबकले. वारीचा विषय सुरू असतानाच प्रश्नांची सरबती करून हा विषय चिंकारा प्रकरणाकडे वळला. आणि वनमंत्र्यांनी सावध पवित्रा घेत. "मी वारीत चालतो, इथं तरी राजकारणाचा विषय नको. परंतु अत्राम यांनी दिलेल्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याचा ताज्या विषयावर भाष्य करणे त्यांना भाग पडलं. मी क्लिनचिट दिल्याचा अर्धवट माहितीवर वर्तमानपत्रांनी चुकीचा अर्थ लावल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. अत्राम यांच्यासंदर्भात चौकशी सुरू असून, परिस्थितीजन्य पुरावा त्याचा अहवाल येणे बाकी आहे. तो आल्यानंतर ज्या गोष्टी समोर येतील, त्यानुसार वन्यजीव कायद्यानुसार योग्य ते कारवाई केली जाईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार तसेच अजित पवार यांनी याप्रकरणी "योग्य ते निर्णय घ्या' असाच सल्ला दिला. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर पत्रकारांच्यात मात्र, गाजत असलेल्या प्रकरणाबाबत बातमी मिळाल्याचं समाधान झालं होतं. पालखी आळंदीतून निघण्यापूर्वीच उघड झालेल्या या चिंकारा प्रकरणाबाबत वारीत चर्चा रंगत होती.
पालखी नातेपुतेत....
धर्मपुरीच्या माळावर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सोहळ्याचे अकरा तोफांची सलामी देऊन स्वागत झालं. पालकमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पालखीचे स्वागत केले. हरिनामाचा गजर करीत सोहळा रणरणत्या उन्हात वाटचाल करीत सोहळा नातेपुतेत विसावला.
- शंकर टेमघरे
Labels: नातेपुते
तोफांच्या सलामीनं सोलापूरकरांनी माऊलींच्या पालखीचं स्वागत केलंय. इथं ही प्रथा आहे. पालखीच्या वाटेवर वेगवेगळ्या गावांत, वेगवेगळ्या जिल्ह्यात स्वागताच्या खूप भावणाऱया प्रथा आहेत. महाराष्ट्रात मराठी बोलीभाषा गावाबरोबर बदलते. प्रथाही तशाच गावाबरोबर बदलतात. पण, प्रत्येक प्रथांमध्ये दिसतो तो वारीविषयीचा अत्यंतिक जिव्हाळा आणि भक्ती. गावची जत्रा भरल्यासारखं वातावरण अख्ख्या गावांत दिसतं. वारी चालते त्या प्रत्येक मार्गावर ही अध्यात्माची आणि व्यवहाराची गंगा वाहताना दिसते.
Labels: सोलापूर
मंगळवारी सकाळी साडे सहाला माऊलींची पालखी निघाली. बरडच्या मुक्कामाहून आता वेध आहेत, ते सोलापूरचे. सकाळच्या विसाव्याला साधुबुवाचा ओढा येथे थांबली आहे. आता काहीवेळातच धर्मापुरीजवळ सोलापूर जिल्ह्यात पालखी प्रवेश करेल...
Labels: सोलापूर
पंढरीच्या वारीवर माहितीपट काढण्याच्या हेतूने लंडन येथील इनेसा वायचुट आणि बॅरिग्टन डी. ला. रोच हे परदेशी वारकरी दिंडी क्रमांक चारमध्ये चालताहेत. त्यांच्या मनातील रिंगणाविषयी भावना मला जाणून घ्यायची होती. त्यासाठी सोमवारी रिंगणामध्ये मी शेडगे पंच मंडळी दिंडी क्रमांक चारजवळ आलो. ते दोघे दिंडीत होते. त्यांतील बॅरिग्टनने पांढरा कुरता सलवार डोक्यात टोपी घातली होती. त्यामुळे तो ओळखू येत नव्हता. इनेसाने आकाशी रंगाचा कुरता सलवार घातला होता. दोघांच्याही हातात कॅमेरे होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकारामांच्या ठेक्यात वारकऱ्यांबरोबर दोघांनीही ताल धरला होता. नाचताना दंग झालेल्या या परदेशी वारकऱ्यांच्या उत्साहाला पारावार राहिला नव्हता. नाचता नाचता ते दोघे देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांचेही शुटींग करीत होते. भक्तीचा हा सोहळा कॅमेऱ्यात साठविताना "ज्ञानोबा- माऊली'च्या ठेक्यात अक्षरशः नाचत होते. रिंगणाच्या या सोहळ्यात त्यांना कशाचं शुटींग करायचं आणि कशाचं नाही, असं झालं होतं. कारण त्यांना साराच भक्तीभाव कॅमेऱ्यात साठवायचा होता...
- शंकर टेमघरे
Labels: बरड
माऊली नामात विदेशीही दंग !
पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी उभा महाराष्ट्र वारीची वाट चालतोय. कोणतेही निमंत्रण नसताना विठुचरणी लीन होण्यासाठी ही मांदियाळी या वाटेवर एकवटलीय. या सोहळ्याचा महिमा आता सातासमुद्रापार गेलाय. यंदाच्या पालखी सोहळ्यात इंग्लडमधील इनेसा वाईचुयी आणि बॅरिंग्टन डी ला रोची हे दिंडी क्रमांक चारमध्ये वारीत चालताहेत. इनेसा कलाकार असून बॅरिंग्टन संपादन तसेच दिगदर्शनाचे काम करीत आहेत. त्यांच्याशी बोलायचं ठरवलं, शनिवारी त्यांना गाठलं. तुम्हाला पंढरीच्या वारीबाबत माहिती कशी मिळाली, त्यावर बॅरिंग्टन म्हणाला, ""लंडनमध्ये आम्ही राहतो, तेथील वसंतराव चाफेकर हे आमचे मित्र. आम्ही त्यांना भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासंदर्भांत बोललो, त्यावेळी त्यांनी आम्हाला पंढरपूर वारीचा संदर्भ दिला. त्यानंतर आम्ही भारतात येऊन आळंदी, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यावेळी वारीबाबतची सर्व माहिती घेतली. आणि त्यावर माहितीपट करण्याचा निर्णय घेतला. यंदा वारीत चालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वर्षभर अगोदर आम्ही इंग्लडमध्ये चालण्याचा सराव केला. यंदा आळंदीपासून वारीत सहभागी झालोय. वारीत चालताना भाषेची अडचण येवू नये, म्हणून सांगलीतील दुभाषी नेमलाय. याच्या माध्यमातून मुलाखती तसेच भौगोलिक माहिती तो आम्हाला चित्रीकरणापूर्वी पुरवितो.
वारीविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, एवढा रोमांचक अनुभव आजपर्यंत पाहावयास मिळाला नाही. कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ भगवंताच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने लोक मैलो न् मैल पायपीट करताना दिसताहेत. निसर्गाची चिंता न करता लोक सहभागी होत आहेत. असा अनुभव आम्हाला जीवनात प्रथमच पाहावयास मिळाला. दोन लाख लोक एकाच वेळी चालतात, त्यांना थकवा जाणवत नाही, ही प्रेरणा येते तरी कुठून? वारकऱ्यांच्या या नित्याच्या सवयीचाही आम्ही अभ्यास करीत आहोत.
वारीत काय अडचण जाणवते, असे विचारले असता, तो म्हणाला, कॅमेऱ्याची बॅग पाठीवर घेऊन चालताना काहीसा त्रास होतोय. आणि धुळीमुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवतोय.
तुम्ही वारीतून काय शिकलात? या प्रश्नावर बॅरिग्टन तातडीने उत्तरला, ऍडजेस्टमेंट. इंग्लडमध्ये माझं घर "एसी' आहे. अशा वातावरणात राहत असताना आम्ही वारीत सर्व काही "ओपन' वावरतोय. आणि हो, वारी आणखी एक शिकलो, "ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली'.''
वारीबाबत काय सुधारणा व्हावी, असे आपण्यास वाटतं असं विचारलं असता, तो हात जोडून म्हणाला, ""एवढ्या मोठ्या सोहळ्याबाबत सुधारणा सूचविण्याएवढा मी मोठा नाही. आमच्याकडं पाच- दहा जणांना ग्रुपने नियोजन केल्याशिवाय वावरता येत नाही. त्याउलट कोणत्याही प्रकारची शासकीय यंत्रणा नसताना लाखो भाविक एकत्र वीस दिवस एकत्र चालतात, राहतात. हा आमच्या दृष्टिने एक चमत्कारच आहे.
वारीविषयी त्यांना विचारले असता,"दोन लाख लोक एकाचवेळी चालतात याची प्ररणा कोठून येते, त्यांना थकवा जाणवत नाही, वारकऱ्यांच्या या नित्याच्या सवयीचा हे दोघे सध्या अभ्यास करीत आहेत.'
पंढरीची वारी हा एक अविष्कार आहे, हे केवळ आपल्यालाच वाटते, हा माझा समज दूर झालाय. जो या वाटेने चालतो, त्याला तो अनुभव आल्याशिवाय राहत नाही, हे मात्र निश्चित...
- शंकर टेमघरे
Labels: फलटण
आळंदी ते पंढरपूर या वारीच्या वाटेवर रिंगणातील आनंद काही औरच. रिंगणाला कोणी पूजा म्हणतात, तर कोणी खेळ. वारकऱ्यांच्या दृष्टिने तो असतो, केवळ एक आनंदसोहळा. सोहळ्यात दोन अश्व असतात. एक स्वाराचा आणि एक माऊलींचा. स्वाराच्या अश्वावर जरीपटक्याचा ध्वज घेतलेला श्रीमंत शितोळे सरकारांचा स्वार असतो. तर माऊलींच्या अश्वावर गादी असते. त्यावर माऊली विराजमान असते, अशी वारकऱ्यांची भावना असते. त्यामुळे या मार्गावर जेवढी गर्दी माऊलींच्या पादुकांच्या दर्शनाला होते, तेवढीच गर्दी या अश्वांच्या दर्शनाला. रिंगणात अश्वांवरील माऊलीला अनुभविण्यासाठी एकच गर्दी झालेली असते. वारीच्या वाटेवर दोन उभी आणि चार गोल रिंगणे होतात.
पहिले उभे रिंगण लोणंदजवळील चांदोबाच्या लिंबाजवळ असते. मंदिराजवळ माऊलींचा रथ थांबतो. अग्रभागी दोन्ही अश्व त्यानंतर रथापुढे २७ आणि त्यानंतर रथ आणि रथामागे २५० दिंड्या अशी सोहळ्यातील रचना असते. सोहळ्याचे नियंत्रण म्हणून असणारे परंपरागत चोपदार रिंगण लावतात. रिंगण लावतात, म्हणजे दिंड्यांमध्ये अश्वाला धावण्यासाठी पुरेशी जागा करुन घेतात. ही सारी प्रक्रिया अवघ्या पाच एक मिनिटात होते. त्यानंतर सुरू होतो, मुख्य सोहळा. यावेळी वारकऱ्यांमध्ये टाळ- मृदंगाच्या गजरात "ज्ञानोबा- माऊली' असे भजन सुरू असते. त्यावर वारकरी नाचत असतात. या दमदार ठेक्यात रिं गण पाहण्यासाठी आलेले भाविकही दंग होतात. रिंगणात माऊली आपल्याबरोबर खेळते, अशी वारकऱ्यांची भावना असते. त्यामुळे एवढ्या गर्दीतही रिंगण लावण्याच्या प्रक्रियेस वेळ लागत नाही. दिंड्यांमधील वारकऱ्यांच्या मागे रिंगण पाहण्यासाठी आलेल्या परिसरातील भाविकांची गर्दी उसळलेली असते. सर्वांनाच आस असते, ती माऊलींच्या अश्वाच्या धावण्याची. काही मिनिटांत चोपदार माऊलींच्या अश्वाला रिंगण दाखवितात. सोबत स्वाराचा अश्व असतोच. अग्रभागी असणारे दोन्ही अश्व बेफाम दौंडत रथाजवळ येऊन रथामागील वीस दिंड्यांपर्यंत जातात. व पुन्हा माघारी फिरून रथाजवळ येतात. त्यांची रथाजवळ पूजा करुन त्यांना प्रसाद दिला जातो. व त्यांना पुन्हा रथापुढील २७ दिंड्यांमध्ये अश्वांना सोडण्यात येते. भरधाव वेगात दोन्ही अश्व एकमेंकांशी स्पर्धा करीत अग्रभागी जातात. कधी स्वाराचा तर कधी माऊलींचा अश्व पुढे- मागे धावतात. हाच क्षण भाविकांना अनुभवायचा असतो. त्यानंतर माऊलीच्या अश्वाच्या पायाखालची धूळ (माती) कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. त्यानंतर चोपदार रथावर चढून चांदीचा चोप उंचावतात. चोप उंचावला रे उंचावला की, जोपर्यंत वारकऱ्या
ंना तो दिसतो, तिथपर्यंत वारकऱ्यांमधील टाळमृदंगांचा गजर आणि भजन थांबते. साऱ्या परिसरात पसरते ती केवळ शांतता. त्यानंतर आरती होऊन चोप गोल फिरवून चोपदार उडी मारतो, यालाच उडीचा कार्यक्रम म्हणतात. उडीनंतर रिंगण सोहळा संपतो. अन्त्या सोहळा चालू लागतो. रंगलेल्या रिंगणानंतर दिंड्यांमध्ये फुगड्या, खो-खो, हुतूतू, कोंबडा, वारकरी पावक्या असे विविध खेळ रंगतात. वारकरी वय विसरून नाचतात. आयुष्यात कधी न नाचलेला वयोवृद्धही वारीच्या वाटेवर "माऊली'नामात दंग होतो, अ्न देहभान विसरून नाचतो. होय, यालाच तर म्हणतात.... आनंदसोहळा.
शनिवारी सारं काही असंच झालं. तोच सोहळा, तेच वारकरी, तिच माऊली अन् तोच उत्साह. रणरणत्या उन्हात माऊलीचा रथ चांदोबाच्या लिंबाजवळ आला. दुपारी सव्वाचारला रिंगण सुरू झालं. बाळासाहेब चोपदार, राजभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब आरफळकर यांनी रिंगण लावून घेतलं. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा- माऊलींच्या जयघोषाने अवघे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालं होतं. बेफाम वेगात दोन्ही अश्व रिंगणात धावले. माऊली- माऊली असा जयघोष झाला. अन् माऊलींच्या अश्वाने घेतलेली बेफाम दौड लाखो भाविकांनी डोळ्यात साठवली. अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. त्यानंतर बाळासाहेब चोपदार यांनी रथावर चढून मानाचा चोप उं चावला. अन् परिसरात शांतता पसरली. त्यानंतर आरती झाली. आणि दिड्यांमध्ये खेळ रंगले. सारं काही वातावरण दरवर्षीप्र माणे होतं. माऊलींच्या अश्व रिंगणात बेफाम धावल्याने वारकऱ्यांत चैतन्य संचारले होते. माऊली आमच्यात खेळली, हीच भावना उराशी बाळगून सोहळा तरडगावात मुक्कामी विसावला.
यावेळी किसनमहाराज साखरे भेटले. त्यांच्याशी रिंगणाबाबत विषय काढला. त्यावेळी ते म्हणाले,"" रिंगण म्हणजे प्रदक्षिणा. देवाच्या उपचारामध्ये सोळा उपचार आहेत. त्याला षोड्पचार असे म्हणतात. या उपचारामध्ये पंचामृत स्नान, धूप, दीप, नै वेद्य, अभिषकासाठी पुरुषसुक्त आणि रुद्र असे अभिषेक आहेत. एक अभिषेकापूर्वीची पूजा व दुसरी अभिषेकानंतरची पूजा. या पूजांना उत्तरपूजा व पूर्वपूजा म्हटली जाते. या उपचारामध्ये देवाला प्रदक्षिणा घालणे हा एक उपचार आहे. जेथे मंदिर नसते. अशा ठिकाणी पूजा करणारा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतो. म्हणजेच प्रदक्षिणा हा वारकरी संप्रदायामध्ये एक महत्त्वाचा उपचार आहे. हे प्रदक्षिणा तत्त्व लक्षात घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांना मध्यभागी घेऊन माऊलींभोवती जेव्हा एखाद्या स्थानावर प्रदक्षिणा करतात. ती गोल प्रदक्षिणा हो आणि माऊलीला मध्यस्थी ठेवून घालण्यात येणाऱ्या प्रदक्षिणेला उभे रिंगण म्हणतात. रिंगण म्हणजे प्रदक्षिणा, परिक्रमा होय. पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळ्याने वारकऱ्यामध्ये भक्ती, प्रीती व चै तन्य निर्माण होते आणि तो उत्साहाने वाटचाल करते.''
- शंकर टेमघरे
सत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण शनिवारी दुपारी चार वाजता चांदोबाचा लिंब येथे उत्साहात पार पडले. लाखो भाविकांनी या रिंगणाचा आंनद अनुभवला. तत्पुर्वी दुपारी एक वाजता वारकऱ्यांनी लोणंदकरांचा निरोप घेतला. ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.
पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचे लिंब येथे असल्याने वारकऱ्यांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसत होता.
ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
वाहतुकीत अडथळा येऊ नये, म्हणून पोलिसांनी सकाळीच यामार्गावरील वाहतूक पुढे काढून दिली. रिंगणानंतर पालखी तरडगावला मुक्कामासाठी रवाना झाली आहे.
- शंकर टेमघरे
माउलींचा पालखी सोहळा अडिच दिवसांच्या मुक्कामासाठी गुरुवारी लोणंदमध्ये विसावला...लोणंदकरांनी दरवर्षीच्याच जल्लोषात पालखीचे स्वागत केले.
लोणंद ही राज्यातील कांद्याची बाजारपेठ. पूर्वी इथले व्यापारी एकत्र निधी जमवून वारकऱयांना जेवण देत असत. खिरीचा नैवेद्य हे इथले वैशिष्ट्य होते. ही मंडळी वाजतगाजत माऊलींच्या पादुकांकडे नैवेद्य नेत असत. त्यानंतर दिवसभर पंगती पडत.
सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकण भागातले वारकरी लोणंदपासूनच वारीत सहभागी होतात. दर्शनासाठीही या भागातून गर्दी होते.
लोणंदचे ग्रामदैवत भैरोबानाथ. पण, माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा गावचा यात्रेचा दिवस. वार्षिक यात्रा याच दिवशी होते. सासुरवाशीणीही याच काळात दोन दिवसांसासाठी लोणंदला येतात. अमावस्येपूर्वी तिथी वाढली, तर इथे अडिच दिवस मुक्काम असतो. नसेल, तर दीड दिवस असतो.
लोणंदचा जवळपास पाच किलोमीटरचा परिसर भाविकांच्या राहुट्यांनी भरतो. यंदा भाविकांची दर्शनबारी तब्बल दीड किलोमीटर लांब पसरली आहे. दिंड्यांमध्ये काही वाद असतील, तर बैठकही लोणंदमध्येच होते, शितोळे सरकारांच्या पालावर. आपण, या बैठकीचीही माहिती करून घेऊ. थोड्याच वेळात.
Labels: लोणंद
बुधवारी पालखीचा मुक्काम वाल्ह्यात होता. पालखी तळावर सोडून आम्ही सर्व पत्रकार बातम्या पाठविण्यासाठी जेजूरीला आलो. बातम्या पाठविल्यानंतर मुक्कामेला निरेला जायचे, असा निर्णय झाला. निरेला विश्रामगृहावर जेवत असताना, आमच्या एका वरिष्ठ बातमीदाराला तहसीलदारांचा मोबाईल आला.
मुख्यमंत्र्यांच्या मिसेस उद्या वाल्ह्यात पहाटपुजेला येणार असून त्या वारीतही चालणार आहेत.
एका नव्या पत्रकाराने ऑफिसला फोन करून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी वारीत चालणार, अशी बातमीही सांगितली. त्या वर्तमानपत्रात बातमी येणार म्हटल्यावर सर्वांनीच जोड म्हणून सर्वच पत्रकारांनी ही दिली. आम्ही सोहळ्याच्या पुढे आल्याने पहाटे वार्तांकनाला कसे जायचे, याबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर एका अनुभवी बातमीदाराने असा पर्याय काढला की, आपल्यातील छायाचित्रकार आणि चॅनेलचे कॅमेरामननी वाल्हात मुक्कामाला जावे. कारण सकाळी निरेतून वाल्ह्याला जाणे होणार नव्हते. आता प्रश्न होता वाल्ह्याच्या मुक्कामाचा. कारण वाल्ह्यामध्ये विश्रामगृह नव्हते. त्यामुळे तंबुत झोपावे लागणार होते. आम्ही सोहळा प्रमुखांना फोन करून चार सहकाऱयांसाठी जागा ठेवण्याचा निरोप दिला. चौघेजण गेले. जेजूरी ते वाल्हे हा आठ-नऊ किलोमीटरचा टप्पा चालल्याने सर्वजण थकलेले होते.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी वारीत चालण्याचा फोटो मिळविण्यासाठी छायाचित्रकरांना जाण्याशिवायही पर्याय नव्हता. विशेष म्हणजे, जाणारे चौघेही नवीन होते. त्यांना तंबूत राहण्यासंबंधी माहिती नव्हती. जवळ कॅमेरेसारख्या मौल्यवान वस्तू होत्या. रात्री साडेअकराच्या सुमारास मंडळी वाल्ह्याला रवाना झाली. सकाळी साडे सहाच्या दरम्यान एका छायाचित्रकाराचा फोन आला, की मॅडम येण्याचे रद्द झाले आहे.
त्यानंतर मी सोहळाप्रमुखांना फोन केला. त्यांनी मला असे सांगितेले की, पोलिसांचा आत्ताच फोन आलाय सौ. देशमुख जेजूरी पास झाल्या आहेत. आम्ही तातडीने छायाचित्रकार आणि अन्य सहकाऱ्यांना रथाजवळ थांबायला सांगितले. त्यानंतर तासाभराच्या अंतराने आम्हाला पोलिसांचा फोन आला की व्हीआयपी ताफ्यातन सौ. देशमुख आल्यात. पण त्या विलासराव देशमुखांच्या पत्नी नाहीत.
त्यानंतर आम्ही पुन्हा फोन केलेत आणि माहिती काढली. कारण गाडीतून उतरेपर्यंत पोलिस, महसूल विभाग, देवस्थान या सर्वांना विलासराव देशमुखांच्या पत्नी येणार अशी सुचना होती. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी येणार म्हणून पंधरा मिनिटे सोहळा थांबूनही ठेवला होता.
सकाळी सव्वा सातच्या दरम्यान ताफा आला. पोलिसांनी खातरजमा केली, तेव्हा त्या विलासराव देशमुख यांच्या पत्नी नसून मुख्यमंत्र्यांचे बंधू आमदार दिलीप देशमुख यांच्या पत्नी सौ. सुवर्णादेवी देशमुख असल्याचं समजलं.
तिथे पोहचलेल्या नव्या छायाचित्रकारांना विलासराव देशमुखांच्या पत्नी माहित नसल्याने त्यांनी शुटींग, फोटो, घेतले. चॅनेलच्या पत्रकाराने तर त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी नकार दिला. या साऱया गोंधळाने वारकरी, महसूल प्रशासन, पोलिस यंत्रणा, देवस्थान आणि पत्रकार या साऱ्यांचेच हाल झाले.
वारकऱ्यांमधून या ताफ्याला वाट काढताना पोलिसांची दमछाक झाली. महसूल खाते रात्रभर जागे होते. रात्री एक वाजता तंबूत झोपलेल्या पत्रकारांना पहाटे साडेतीनला उठावे लागले होते.
मोहिमेवर पाठविलेले चौघेजण आम्हाला निरेत भेटले. प्रचंड त्रासलेल्या अवस्थेत त्यांनी तिथल्या घडामोडींचे फोटो दाखवले !
प्रश्न असा आहे, की एका आमदाराच्या पत्नीसाठी एवढा फौजफाटा कशासाठी ? लाखो वारकरी पायी चालत विठूरायाच्या दर्शनाला जातात. बुधवारी समाजआरतीच्या वेळेत मिनिटभराचाही उशीर झालेला नव्हता. मग, गुरुवारी वारकऱयांना तिष्ठत ठेवणे किती योग्य होते ?
वारीत गेल्या तीन-चार वर्षांपासून पत्रकारांना रेस्ट हाऊस, इंटरनेट, फॅक्स या सुविधा सहज उपलब्ध होऊ लागल्यानं अशा पद्धतीची धावपळ खूप कमी झाली आहे.
बऱयाच काळानं अशी धावपळ झाली सगळ्यांची !
संतानाना चोपदार यांच्याशी हा विषय निघाला, तेव्हा ते म्हणाले, वारीत चालणारा प्रत्येक जण वारकरी असतो. माऊलींपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. यासाठी सोहळ्याला वेठीस धरणं योग्य नाही. या मंडळींच्या वारीत चालण्यानं अनेक अडचणी येतात. वारकऱयांना त्रास होतो. याची जाणिव या मंडळींना व्हायला हवी. किंवा फौजफाटा न घेता, इथं यायला हवं.
एक माहिती सांगण्यासारखी आहे. मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी गेल्या सहा-सात वर्षांपासून वारीत चालतात. दिंडीत सकाळी सहापासून संध्याकाळी सहापर्यंत असतात. कधीही त्यांनी व्हिआयपी असल्याचं मिरवलेलं नाही. पाडेगावच्या दुपारच्या जेवणात, एका सहकाऱयानं त्यांना विचारलं, की तुम्ही का नाही व्हिआयपीची सुविधा घेत?
पाचपुतेंच्या पत्नींचं उत्तर होतं, मी माऊलीसाठी चालते...
संध्याकाळी माऊलींची वारी लोणंद मुक्कामी पोहोचली आहे...
- शंकर टेमघरेLabels: लोणंद