न्याहरीची रंगत....

सकाळी बरडहून पालखी सोहळा निघाला. हा परिसर तसा दुष्काळीच. काटेरी बाभळी, झाडेझुडपांचा इथे सुकाळ. लोकसंख्या अडीच तीन हजार. वारकऱ्यांचा महासागर लोटल्यानंतर गावाचा चेहरामोहराच बदलून गेला होता. सारं गाव भक्तीसागरात डुंबत होतं. आणि भल्या पहाटेच या सागराला ओहोटी लागली आणि एकएक प्रवाह दिंडी रुपात पुढं सरकू लागला. सकाळच्या टप्प्यात वातावरणात गारवा होता. नऊनंतर मात्र, उन्हाचा चांगलाच चटका लागत होता. वाऱ्यामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास वारकऱ्यांना होत होता. मात्र, गारवा मनाला उभारी देत होता. नऊच्या सुमारास माऊली साधुबुवांच्या ओढ्याजवळी मंदिरात थांबली. आणि चालणारे वारकरी उजाड रानमाळावर विखुरले. येथे संपतमहाराज कुंभारगावकर यांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना बाजरीची भाकरी अन्‌ तिखट आमटी दरवर्षी दिली जाते. या आमटीची चव काही न्यारीच असते. बाजरीच्या भाकरीचा हाताने भुगा करून पितळी (ताटात) ओतलेली आमटी कालवून फुरका मारीत रंगणारा हा रानभोजणाचा आगळावेगळा अनुभव याठिकाणी येतो. काटेरी झुडपांच्या आडोशाला आधार घेऊन दिंड्या न्याहारीच्या कार्यक्रमाला विसावल्या होत्या. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने आल्हाददायक वातावरणातील वाटचाल सुखकारक वाटत होती. भगव्या भक्तीचं हे वारकऱ्याचं गाव नाचत गात पुढं सरकतं होतं. पताका वाऱ्यावर फडफडत होत्या. टाळमृदगाच्या निनादानं अवघा आसमंत दणाणून गेला होता. दक्षिणेला शिंगणापुराच्या महादेवाचा डोंगर दिसत होता.

चिंकाराची चर्चा....
करीत निघालेल्या या सोहळ्यात वनमंत्री बबनराव पाचपुते सपत्निक चालत होते. आजूबाजूला वनकर्मचाऱ्यांची मांदियाळी होती. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत वन अधिकारी पाचपुतेंना सामोरे आले. एक हार माऊलींसाठी तर दुसरा हार मंत्र्यासाठी तयार होता. धर्मपुरीजवळ सोलापूर हद्दीत पालकी सोहळा प्रवेश करणार होता. परंतु त्याअगोदर वनमंत्र्याचं जंगी स्वागत केलं. आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. सायबाचं कौतुक करायला मिळाल्याचं समाधान कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर तरळलं होत. एवढ्यात सोहळ्याबरोबर चालणाऱ्या पत्रकारांचा जथ्था आल्याचं दिसतात. वनमंत्री थबकले. वारीचा विषय सुरू असतानाच प्रश्‍नांची सरबती करून हा विषय चिंकारा प्रकरणाकडे वळला. आणि वनमंत्र्यांनी सावध पवित्रा घेत. "मी वारीत चालतो, इथं तरी राजकारणाचा विषय नको. परंतु अत्राम यांनी दिलेल्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याचा ताज्या विषयावर भाष्य करणे त्यांना भाग पडलं. मी क्‍लिनचिट दिल्याचा अर्धवट माहितीवर वर्तमानपत्रांनी चुकीचा अर्थ लावल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. अत्राम यांच्यासंदर्भात चौकशी सुरू असून, परिस्थितीजन्य पुरावा त्याचा अहवाल येणे बाकी आहे. तो आल्यानंतर ज्या गोष्टी समोर येतील, त्यानुसार वन्यजीव कायद्यानुसार योग्य ते कारवाई केली जाईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार तसेच अजित पवार यांनी याप्रकरणी "योग्य ते निर्णय घ्या' असाच सल्ला दिला. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर पत्रकारांच्यात मात्र, गाजत असलेल्या प्रकरणाबाबत बातमी मिळाल्याचं समाधान झालं होतं. पालखी आळंदीतून निघण्यापूर्वीच उघड झालेल्या या चिंकारा प्रकरणाबाबत वारीत चर्चा रंगत होती.

पालखी नातेपुतेत....
धर्मपुरीच्या माळावर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सोहळ्याचे अकरा तोफांची सलामी देऊन स्वागत झालं. पालकमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पालखीचे स्वागत केले. हरिनामाचा गजर करीत सोहळा रणरणत्या उन्हात वाटचाल करीत सोहळा नातेपुतेत विसावला.

- शंकर टेमघरे

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India