माऊली पालखीसोबत पंढरीला जाताना जेवढे वारकरी असतात, तेवढे येताना नसतात. जाताना पालखीसमवेत सुमारे अडीच ते तीन लाख भाविक पंढरीची वाट चालतात. आषाढी एकादशीला तर आठ लाख भाविकांच्या गर्दीनं सारं पंढरपूर भरून जातं. एकादशी ते पौर्णिमा या दरम्यान पालखीचा मुक्काम असतो, पंढरपुरातील ज्ञानेश्‍वर महाराज मंदिरात. पोर्णिमेला येथील पालखी परतीला निघते. त्यावेळी मोठ्या श्रद्धने पंढरपूरमधील भाविक माऊलीला निरोप देतात. "माऊली माऊली' चा जयघोष करून मोठ्या आपुलकीनं पुढंच्या वर्षाचं निमंत्रण देतात. पालखी परतीला लागते. आळंदी ते पंढरपूर या दरम्यान सतरा अठरा दिवस लागणारं परतीचं अंतर मात्र, अवघ्या दहा दिवसांत वारकरी पार करतात. आता तुम्ही म्हणाल असं कसं. तर येतानाच्या प्रवासात लहान अंतरांच्या दोन दिवसाचा प्रवास वारकरी एका दिवसात पार करतात. जातानाच्या प्रवासात परतीला देवस्थान आणि चोपदार यांनी नंबर दिलेल्या दिंड्यांना परतीच्या वाटचालीत विणेकरी वारकरीनं चालणं बंधनकारक असतं. त्यामुळं परतीच्या प्रवासात एका दिंडीचा किमान एक किंवा दोन वारकरी असतात. त्यामुळं तीनशे दिंड्यांचे मिळून सहा- सातशे वारकरी असतात. परतीच्या प्रवासातील वाट खडतर समजली जाते, पंढरीला जाताना मोठा जनसमुदाय असतो. मोठा लवाजमा असतो, आणि रोजची सरासरी सतरा- अठरा किलोमीटरची वाटचाल. परतीला मात्र, स्थिती वेगळी असते.

खडतर वाट...
कधी एकदाचं घरी जातोय, होय, अगदी असंच झालं असतं आपल्याला. पंधरा वीस दिवस घराबाहेर राहिल्यावर आपल्यातील कोणाचीही प्रतिक्रिया अशीच असली असती. परंतु, पंढरीच्या सावळ्या विठुचा छंद लागलेल्या परतीच्या वारकऱ्यांना मात्र त्याचं भान नसतं. त्यांना आणखी दहा बारा दिवस घरी जाता येणार नाही. पण, त्यांना त्याचं काही सोयरं सुतक वाटत नाही. माऊलीसोबत पंढरीला घेऊन जायंच अन्‌ माऊलीला पुन्हा आळंदीला आणून सोडायचं, हा नेमधर्म पाळणारा म्हणजे परतीचा निष्ठावंत वारकरी.

परतीला भजनाचा आनंद अधिक
पंढरीला जाताना मोठ्या थाटामाटात अन्‌ ऐश्‍वर्यात जाणारा हा सोहळा परतीला अगदी साधासुधा असतो. परतीला ना नगारा ना अश्‍व अन्‌ ना दिंड्या. यावेळी दिंड्यांतील विणेकऱ्यांसह असतात केवळ पाच- सातशे वारकरी. परतीचा प्रवास तसा खडतर. जातानाचे दोन मुक्काम येताना एका दिवसात पार पाडायचे असतात. त्यामुळं या मंडळीचा दिवस उगवतो, दीडला. दुपारच्या नव्हे, रात्रीच्या दीडला. अंघोळी करून वारकरी वाटेला लागतात. पहाटे दोन ते सकाळी सात-साडेसात या चार- पाच तासांमध्ये सतरा पंधरा सोळा किलोमीटरची वाट वारकरी सहज मागं टाकतात. बरं त्यावेळी रात्र आहे, म्हणून भजन वैगेरे बंद नसतं. पालखीचा रथ निघाला की, भजनाला सुरवात होते. परतीच्या प्रवासात सोहळ्याचे मिळून बहुतांश वेळा एकच भजन असतं. त्यांच्यात एकसुरीपणा अधिक जाणवतो. सकाळची वाट चालल्यानंतर सोहळा थांबतो. त्यावेळी नुकतंच तांबड फटलेलं असतं. त्या गावातंल्या मंडळींना "यांना झोपा आहेत की नाही' असं वाटनं स्वाभाविक आहे. कारण रात्रीरुत्रीचं चालायंच तसं अवघड काम. मात्र, माऊलीमय झालेल्या त्या वारकऱ्यांना रात्र काय आणि दिवस काय, कशाचीच चिंता नसते. कारण, चिंताहारी माऊली माझ्या सोबत आहे, हा विश्‍वास त्यांच्या मनात असतो. सकाळच्या या वाटचालीत वारकरी एखादा विसावा घेतात. त्यावेळी काही गावातील ग्रामस्थ रात्रभर जागून या वाटसरूंना पहाटे चार साडेचारच्या सुमारास चहा देतात. तर काही ठिकाणी पोहे, उपीट, एकच्या सुमारास पुन्हा वाटचाल. सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत जेवनासाठी विसावा असतो. घेऊन ही मंडळी पुन्हा चालू लागतात. सायंकाळी सातला वारकरी मुक्कामासाठी विसावतात. पहाटे दोन ते सायंकाळी सात या कालावधीत हे वारकरी किमान पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर मागे टाकतात. परतीला पालखीच्या दर्शनाला गर्दीही नसते. आणि वाहनांची वर्दळही नसते. त्यामुळं वारकऱ्यांना
भजनाचा आनंद मिळते. हा प्रवास वारकऱ्यांना खडतर असला तरी आनंददायी निश्‍चित असतो.

निंदनीय प्रकार
अशीच वाटचाल करीत ही मंडळी आज नातेपुत्यात आलीय. अरे हो, जातानाच्या वाटचालीतला एक किस्सा तुम्हाला सांगायचाच राहिलाय. पंढरपूरला जाताना पालखीचा नातेपुते मुक्कामात घडलेली घटना. झालं असं, की भोई समाज दिंडीचे माऊलींच्या तंबूशेजारीच तंबू असतात. पालखी आली, की या सर्वच गावात जत्रेचं वातावरण असतं. त्या काळात काही टारगट मुलं या गर्दीतून फिरत असतात. अशाच एका मुलानं भोई समाज दिंडीतील एका मुलीची छेड काढली. त्यावेळी त्याच दिंडीतील वारकऱ्यांना या मुलाला चांगलेच खडसावले. झालेल्या अपमानानं चिडून काही वेळानं तो मुलगा वीस पंचवीस मुलांची फौज घेऊन पुन्हा दिंडीपाशी आला. त्यावेळी त्यानं थेट तंबूतील वारकऱ्यांना मारायला सुरवात केली. त्यावेळी दमलेल्या या वारकऱ्यांना चक्क मार खावा लागला. त्यानंतर हे वारकरी देवस्थानच्या कार्यालयात गेले. तेथे पोलिसांच्या सामुपचाराने सारं काही मिटलं. मात्र, हा प्रकार निंदनीय असल्यानं सोहळ्याच्या मालकांनी पुढील वर्षी नातेपुत्यात मुक्काम करायचा नाही,असा निर्णय जाहीर केला. आणि नातेपुतेकरांच्या झोपा उडाल्या. सहा सात तासांच्या आत ग्रामस्थांनी संबंधित मुलांना माफी मागायला लावून पोलिसांच्या स्वाधीन केले. पण, मुक्काम रद्द करू नका अशी गळ घातली. मात्र, या मुक्कामाबाबतचा निर्णय आ पुढच्या वारीच्या वेळीच होणार. अशा प्रकारचा वारकऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार दोन तीन वर्षांपासून वाढले आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घ्यायला हवा.
-शंकर टेमघरे

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India