वारीच्या वाटेवर निरा नदीत माऊलींच्या पादूंकांना स्नान घालण्याची परंपरा आहे. नदीच्या अलिकडे रथ थांबविण्यात येतो. पालखीतून पादूका आरफळकरांच्या हातात
दिल्या जातात. त्यानंतर दत्त घाटावर पादुकांना स्नान घालण्यात येते. हा क्षण टिपण्यासाठी हजारो भाविकांनी दोन्ही तीरांवर गर्दी केलेली असते. ज्ञानोबा-तुकारामांचा
जयघोष सुरू असतो. आरफळकरांच्या हस्ते पादुकांना स्नान घालण्यात येते.

पालखीनं या काळात आठवडाभराचा प्रवास केलेला असतो. बहुतांश पुणे जिल्ह्यातील भाविक पालखीला इथं निरोप देतात. इथून पुढं सातारा जिल्हा सुरू होणार असतो. माऊलींच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्यातील भाविक दुसऱया तीरावर सज्ज असतात. हैबतबाबा आरफळकर सातारा जिल्ह्यातील. त्यामुळेही सातारा जिल्ह्यात अमाप उत्साह असतो. पाडेगाव तालुक्याच्या हद्दीत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सोहळ्याचं स्वागत करण्यात येतं. महसूल, आरोग्य आणि पोलीस विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या पथकांना इथे निरोप दिला जातो आणि सातारा जिल्ह्यातील पथकांचं स्वागत करण्यात येतं.

निरोप आणि स्वागताचा हा सोहळा पालखीच्या एकूण वाटेवरचा एक आगळा सोहळा ठरतो. आत्ताही, थोड्या वेळात पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. आणि हा सोहळा आणखी एकदा अनुभवता येईल...

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India