वासुदेवाशी बोलणं संपत आलं तसा माऊलींचा पालखी सोहळा मांडवे ओढ्यावर विसावला होता. रिंगणाचा सोहळा असल्यानं भाविकांचे डोळे सदाशिवनगरला होते. रिंगण दुपारी दोन वाजता होते. मात्र, सकाळी दहापासूनच भाविकांनी जागा धरून ठेवल्या होत्या. जेवणाचा कार्यक्रम उरकून पालखी दोन वाजता रिंगणाच्या परिसरात आली. चोपदारांनी दिंड्या लावून घेतल्या. माऊलींचा अश्व आणि पालखी दिंड्यातून वाट काढून रिंगणाच्या मधोमध आली. अश्वांना धावण्याच्या रिंगणात नेले. माजी खासदार प्रतापसिंह मोहिते पाटील आणि पदमजा देवी मोहिते पाटील यांनी पालखीची पुजा केली. अश्वांना हार अर्पण केले. दरम्यानच्या काळात पताकाधारी वारकऱयांनी पालखीच्याकडेने दाटी केली होती. मुख्य सोहळा पाहण्यासाठी वारकरी आसुसले होते.

सव्वा दोनच्या सुमारास चोपदाऱांच्या इशाऱयानंतर भोपळे दिंडीतील मानकऱयाने रिंगणाला तीन फेऱया मांडल्या. त्यानंतर उद्धव चोपदार याने माऊलींच्या अश्वाला रिंगण दाखविले. त्यापाठोपाठ स्वाराच्या अश्वानं एक रिंगण पूर्ण केले. त्यानंतर माऊलींच्या अश्वाला रिंगणात सोडण्यात आले. दोन्ही स्वारांनी काहीक्षणात रिंगणाला तीन फेऱया घातल्या. यावेळी माऊली नामाच्या गजरानं आसमंत दणाणून गेला होता. रिंगण संपताच टापांखालील माती कपाळाला लावण्यासाठी वारकऱयांची झुंबड उडाली.

दरम्यानच्या काळात अश्वांनी रंगवलेल्या रिंगणाचा आनंद दिंड्या-दिंड्यांमधून दिसत होता. पारंपरीक खेळ रंगले होते. वास्करांच्या दिंडीत नेहमीप्रमाणे राजकाऱयांचा गलका होता. विवेकानंद वास्कर, प्रतापसिंह मोहिते पाटील, बबनराव पाचपुते यांनी फुगडी खेळली. त्यानंतर साऱयांच्याच आग्रहानं प्रतापसिंह मोहिते पाटील आणि पदमजादेवी मोहिते पाटील यांनीही फुगडी खेळली. बबनराव पाचपुते आणि त्यांच्या सौ. पाचपुते यांचीही फुगडी रंगली. सारं राजकारण बाजुला ठेवून रंगलेला हा खेळ या नेत्यांनी अगदी मनापासून खेळला हे खरं...!

हा आनंद घेऊनच सोहळा पुढे मार्गस्थ झाला. रात्री सात वाजता सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचला.

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India