बंधूभेटीने वारकरी गहिवरले
तोडल्यापासून टप्पा म्हणून ठिकाण पाच किलोमीटरवर आहे. तेथे शुक्रवारी सायंकाळी माऊली- सोपानदेव भेटीचा सोहळा पाहण्यासाठी आम्ही निघालो. पण, जेवण खूप झाल्यानं कोणालाही चालण आता जमणार नव्हतं. आम्ही गाडीत बसून टप्प्यावर गेलो. तेथे माऊलींच्या पालखीचा रथ साडेचारच्या सुमारास आला. त्यापाठोपाठ पंधरा मिनिटांच्या अंतरानं सोपानकाकांचा रथ आला. दोन्ही रथ एकमेकांना चिटकून उभे करण्यात आलं. दोन्ही देवस्थान, मानकऱ्यांकडून एकमेकांना नारळ- प्रसाद देण्यात आला. यावेळी सोपानकाकाच्या सोहळ्याबरोबर आलेल्या भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तर माऊलीच्या सोहळ्यातील भाविकांनी सोपानकाकांच्या पादुकांचे दर्शन घेतले. बंधूभेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी येथे प्रचंड गर्दी झाली होती. तोफांनी सलामी देण्यात आली. तसेच दोन्ही संताचा जयजयकार केला. बंधूभेटीच्या या सोहळ्यानं दोन्ही सोहळ्यातील वारकरी गहिवरलेले होते. त्याकाळात समाजातील अनिष्ठ प्रवृत्तीच्या विचारांच्या लोकांनी या भावडांना स्वीकारले नाही. आणि हाच समाज आज या भावडांच्या पालख्या काढून गर्दी करतात. याच विचारांनी माझं मन सुन्न झालं होतं. का वागतात अशी लोक, अशा प्रश्‍न मला पडला होता. त्यातचं पुन्हा चालायला लागलो.

आम्ही चहा घ्यायला गेलो, आमच्यातील एकानं चहावाल्याला नाव विचारले. त्यानं सुधीर संकपाळ असं नाव सागितलं. गाव विचारलं. त्यावर त्यांन बार्शीचा असल्याचं सांगितलं. आम्ही पत्रकार असल्याचं समजल्यावर त्यानं विचारलं साहेब, डी. फार्मसीचा निकाल लागला का हो?

त्यावर मी म्हणलो, कोण आहे, फार्मसीला, मीच साहेब, तो म्हणाला. फार्मसी झालायं मग इथं कसा तू, त्यावर तो म्हणाला, वारीत जगायला नाय तर वागायला कसं ते शिकवलं जातं. वारीची परंपरा आहे, का असं विचारलं असता तो म्हणाला, परंपरा नाय, पण आमचं घर माळकरी आहे. गावाकडं पाऊस झाला नाय, अन्‌ नोकरी मागायला गेलो, तर दुचाकी असेल, तर नोकरी मिळंल, असं सांगितलं. त्यामुळं वारीला यायचं ठरवलं. त्यानंतर वारीत हडपसरमध्ये सामील झालो. दोन दिवसांनंतर एक ठिकाणी पोलिसांचा लाथा खाल्ल्या. त्यावेळी वाटलं परत जावं. पण नंतर असं वाटलं, आपण तर तमाशाला तर जात नाहीत ना. बघू काय होईल, ते होईल. म्हणून निघालो.

किमान पाचशे कप गेले तरी समाधानी हाय साहेब, पण सातशे हजार कप होतात. त्यामुळे या वारीत दहा एक हजार होतील, घरी पाच- सहा हजार आहेत. त्यामुळं गाडी घेऊन नोकरीला लागायचं ठरवलंय. अन्‌ नोकरी चांगली लागली तर बी. फार्मसी करायचीय....सुधीरची कथा ऐकून मन गलबललं...

वारी कुणाकुणाला काय काय देते...याचं आणखी एक दर्शन झालं...


दही- धपाट्यांवर ताव

तोडलं- बोडलं तसेच परिसरातील गावांमधील ग्रामस्थ माऊलींची सोहळ्यातील वारकऱ्यांना दरवर्षी जेऊ घालता. येथे दरवर्षी ठरलेला मेनू असतो. दही- धपाटेचा. पालखी थांबताच गावात विविध ठिकाणी वारकऱ्याच्या जेवणाच्या पंगती बसलेल्या दिसत होत्या. सकाळचा नाष्टा खूप झाल्यानं आमच्यातील नवीन गॅंग जेवण करण्याच्या मनस्थितीत नव्हते. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं होतं, पण त्यांना माहित येथील गावरान बेत माहित नव्हता. मीही त्यांच्याबरोबरच नाष्टा केला होता, पण दही- धपाटे खाल्ले नाही, तर वारीत काय खाल्लं, असं वाटल्याशिवाय राहिलं नसतं. मी त्यांना म्हणालो, वासकर महाराजांनी बोलावलयं, नुसतं बरोबर चला, वाटल्यास जेऊ नका. गर्दीतून वाट काढीत आम्ही वासकरांच पाल गाठलं. गेल्या गेल्याच महाराजांनी आतील मानसांना आवाज दिला, "पत्रकार आलेत, त्यांना पहिलं जेवायला वाढा,' आम्ही जुनी मंडळी लगेच पंगतीला बसलो, नवे गडी जेवायला नको म्हणाले. त्यानंतर महाराजांनी "थोडं थोडं खा' असा आग्रह धरल्यानं सारेच बसलो. वाढायला सुरवात झाली. दही धपाटे, ठेचा, पिढलं, भाकरी, हुसळ, घरी बनवलेलं लोणचं, खीर आणि भात असा पदार्थ ताटात आले." नको नको' म्हणेपर्यत ग्रामस्थांनी ताटातून वाढून ठेवलंही होतं. जेवण सुरू झाल्यावर मात्र, चित्र बदलल होत. दही धपाट्याची आडवा हात मारण्यात जेवन नको म्हणणारेही आघाडीवर होते. कारण त्यांची चव काय औरच होती. जेवण झाल्यावर नव्या लोकांनी मला धारेवर धरलं. "इथे एवढं चागलं मेनू असतो, हे आम्हाला आधी माहित असते तर आम्ही दीड तासापूर्वी हॉटेलचा नाष्टा केला नसता. तू आधी सांगितलं का सांगितलं नाही. नाष्टा केला नसता तर आणखी दोन- तीन धपाटे खायला मिळाले असते.' त्यांनी मला विचारलेल्या जाबाचे माझ्याकडं उत्तर नव्हतं. मी त्यांना म्हणालो, तुमचं बरोबर आहे, माझंच चुकलं. आता पुढच्या वर्षी लक्षात ठेवा, इथं येताना सकाळ
चा नाष्टा करायचा नाही. तृप्त मनाने आम्ही गाडीत जाऊन बसलो.

नंदाच्या ओढ्यात सोहळा न्हाला
शुक्रवारी सकाळी रिंगणाजवळ भजी- पाव, वडा- पावची न्याहरी केली अन्‌ वाटचाल सुरू केली. दरवर्षी ठरल्याप्रमाणे दुपारचं जेवण वासकरांच्या तंबूवर होतं. बाराच्या सुमारास आम्ही तोडल्यात पोहोचलो. तेथे तोफांची सलामीने माऊलींचे स्वागत करण्यात आलं. तोडलं आणि बोडलं ही दोन गावं नंदाच्या ओढ्यानं जोडली गेलीत. दरवर्षी या ओढ्यातील पाण्यातून पालखी नेण्यात येते. पाऊस नसल्यास ओढ्याला कॅनॉलमधून पाणी सोडण्यात येतं. त्यानुसार आजही पाणी सोडण्यात आलं होतं. साडेबाराच्या सुमारास ग्रामस्थांनी पालखी या ओढ्यातून पलिकडं नेली. यावेळी पालखीतील पादुकांवर पाणी उडविण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडते. त्यामुळे ओढ्यातून पालखी ओलांडेपर्यंत लांबून पाण्याचे फवारे उडाल्याचा भास होतो. सकाळपासून ढगाळ हवामानामुळे वारकरी घामाने डबडबलेले होते. तसेच पाऊस नसल्याने वारकरी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविताना दिसले. तर काहींनी डुबकी मारून आंघोळ्याही केल्या. पालखी कट्ट्यावर ठेवली तसे आम्हीही वासकरांच्या दिंडीकडे निघालो.

- शंकर टेमघरे

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India