गुरुवारी सोहळा माळशिरस मुक्कामी असताना आम्ही अकलूजमध्ये मुक्कामी होतो. सकाळी उठून खुडूस फाट्यावरील रिंगण पाहाण्यासाठी आम्ही पहाटे पाचलाच उठलो होतो. आवरून रिंगणात गेलो. माऊलींची पालखी नऊच्या सुमारास खुडूसच्या मैदानावर आली. येथील मैदान लहान असल्याने रिंगण लावण्यासाठी तसा उशीरच झाला. या वर्षी माऊलींचा तसेच, स्वाराचा अश्‍व हे दोन्ही रेसचे घोडे आहेत. त्यामुळे रिंगणात पळताना त्यांचा वेगही अधिक असतो. या पार्श्‍वभूमीवर हे रिंगण कमी वाटत होते. चोपदारांनी रिंगण लावले आणि अश्‍व सोडण्यात आले. या वेळी माऊलींच्या नामाच्या जयघोषाने सारा आसमंत दणाणून गेला. अतिउत्साही भाविक मधेच उठल्याने माऊलींचा अश्‍व बिचकला, आणि भाविकांमध्ये घुसला. तीन ते चार लोकांच्या अंगावर गेल्याने ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर पुन्हा अश्‍वांना रिंगणात सोडण्यात आले. अश्‍वांनी दोन फेऱ्या मारून रिंगण रंगविले. साऱ्यांप्रमाणे मीही या रिंगणाचा आनंद अनुभवला. मात्र, अश्‍व भाविकात घुसल्याची घटना माझ्या मनातून गेली नव्हती. भाविकांत घुसलेला अश्‍व तसाच धावत राहिला असता, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती, या विचारांनी मी घाबरून गेलो होतो. त्यामुळे जखमी झालेल्या भाविकांना भेटण्याची माझी इच्छा झाली. त्यामध्ये 65 वयाच्या वृद्ध महिलेच्या पायावर अश्‍वाची टाच लागली होती. मी जाऊन विचारले, आजी जास्त लागले का? तर, ती उत्तरली...नाय माऊलींचा पाय नुसताच घासून गेलाय. लोक टापांखालची माती घेण्यासाठी तडफडतायत...अन्‌ मला त्याचा पाय लागला म्हणून काय झालं..?तिच्या या उत्तराने मी पुरता स्तिमित झालो होतो. तत्क्षणी मला असं जाणवलं की काय ही अंधश्रद्धा..? आणि मी चालू लागलो. एक- दोन किलोमीटरनंतर मला तीच महिला चालताना दिसली. त्या वेळी मला असे जाणवले, की माऊलींचा पाय पडला, तरी त्यात स्वत:ला धन्य समजणे ही माझ्या दृष
्टीने अंधश्रद्धा होती. पण, एवढे मोठे संकट येऊनही न डगमगता पुन्हा वारीची वाट धरून चालायचे, ही केवढी श्रद्धा...!


एरव्ही किरकोळ जखम झाली, तरी तिचा बाऊ केला जातो. मात्र, इक्षे प्रसंग जीवावर बेतला असतानाही तिचा माऊलींवरचा दृढ विश्‍वास तसूभरही कमी झाला नाही. हे सर्व बळ श्रद्धेचेच असू शकते.
- शंकर टेमघरे

1 comments:

 1. Anonymous said...

  Dear Shankar Dada,

  Amhala USA madhye baslya baslya vari ghadavlya baddal dhanyavad.

  Tya savlya parabramhachya charni, tasech sarva varkaryanchya charni sashtang namaskar!

  Regards
  -Unmesh Deshpande
  Texas, USA  


 

Sakaal Media Group, Pune, India