माऊलींचा सोहळा सकाळी साडेसहाला नातेपुतेहून मार्गस्थ झाला. आम्ही मात्र उशिरा उठल्यानं साडे आठला रस्त्याला लागलो. माऊलींचा रथ गाठण्यासाठी आम्ही गाडीतून जायचं ठरवलं. जाताना दिंड्यांमध्ये वासुदेव नाचताना दिसला. त्याच्याशी बोलायचं ठरवलं, पण रथ गाठण्यासाठी गाडी सोडता येत नव्हती. त्यामुळं त्याला आम्ही गाडीतच घेतलं. त्याच्याशी झालेलं बोलणं त्याच्याच शब्दात इथं देतोयः

मी मुळचा अकोल्याचा. पंधरा दिवसांची वाटचाल करून आळंदीला आलो. तिथून वारीसोबत चालतोय, या वासुदेवानं सांगितलं...

अकोल्यातल्या कॉलेजात शिपाई म्हणून कामाला होतो. पर्मनंट करण्यासाठी एक लाख रुपये मागितल्यामुळं मी बाहेर पडलो. त्यानंतर गुलाबराव महाराजांकडे गेलो. तेथे त्यांनी वासुदेवाचं शिक्षण दिलं. त्यावरच सध्या उदरनिर्वाह चालतोय. वर्षातून दहा महिने घराबाहेर असतो. या काळात बाहेर फिरून होईल तेवढे पैसे घरी मनी ऑर्डरनं पाठवतोय.

वारी बावीस वर्षांपासून करतोय. वारीसारखं सुख नाही. या सोहळ्यात हरिनामाचा गजर करायला तर मिळतोच आणि आर्थिक उत्पन्नही दोन-अडिच हजाराच्या घरात जातं.

मंदिर, पोलीस ठाण्याच्याबाहेर झोपतो...वासुदेवाचं मुख्य काम प्रबोधन करणं हे आहे. त्याप्रमाणं मी नाशिक परिसरात अधिकाधिक काळ हे काम करतो. ज्या घराबाहेर तुळशी वृंदावन आहे, तिथंच भिक्षा मागायची हा नेम आहे. अनेकदा बाहेर नागरीकांचा त्रासही होतो. दारुडे, गावातील टारगट मुलं त्रास देतात. त्यामुळं पोलीस ठाण्याचा आश्रय घेऊन रात्री मुक्काम करतो.

मंगळवारी रात्रीच नातेपुतेमध्ये असं झालं...मी एका घराबाहेर थांबलो असताना एकानं विचारलं, काय करतो रे. मी सांगितलं, थोडं सावलीत थांबलोय. ऊन जास्त आहे. थोड्या वेळानं जाईन इथून. त्यावर त्या माणसानं काठीच काढली...मी म्हणालो, तु कितीही मार, मी प्रतिकार करणार नाही. हे सारं बोलणं, एक वृद्ध महिला एेकत होती. तिला राहावलं नाही. ती समोर आली आणि तिनं त्या माणसाला दरडावलं. या वृद्धेमध्ये मला माऊलीचं दर्शन झालं...


या वासुदेवासारखे लाखो वारकरी असं माणसांत देव शोधतात...आणि सोप्या शब्दांत अध्यात्माचा अर्थ सांगतात...

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India