घ्यावे भाकरी-भोकरी...दही भाताची शिदोरी...

होय असाच प्रत्यय आला बुधवारी सकाळी दौंडज खिंडीत. माऊलींची पालखी नेहमीप्रमाणं सकाळी साडे आठच्या दरम्यान खिंडीत आली. वारकरी लगतच्या माळरानावर विसावले. परिसरातील गावकऱयांनी आणलेल्या न्याहारीची शिदोरी सुटली आणि भाजी-भाकरी, पिठलं, चटण्यांचा घमघमाट सुटला.

या अभंगाचा प्रत्यय त्याच क्षणी आला.

खरं म्हणजे दरवर्षी दौंडज खिंड हिरवीगार दिसते. यावर्षी पाऊस कमी झालाय. खिंडीचा परिसर काहीसा सुनासुना दिसतोय. हिरवी छटा जरूर आहे, पण दरवर्षी इतका, हिरवा गार गालिचा नाहीय. पालखीचा जथ्था चालत असताना शेजारूनच मालगाडी धडधडत गेली. अध्यात्म आणि आधुनिकतेच्या प्रवाहाचा संगम दाखवणारे हे देखणं दृश्य होतं.

सकाळच्या विसाव्यापर्यंत पावसाचं चिन्हं नव्हतं. उलट थोडसं उन्हंही होतं. विसावा संपतानाच जोरदार सर आली आणि वारकऱयांना चिंब करून गेली. पालखी दौंडज गावामध्ये साडे अकराच्या दरम्यान पोहोचली.

वाल्हे गाव वाल्मिकी ऋषींचं, असं मानतात. वाल्मीकी ऋषी वाल्या कोळी असताना, याच दौंडज खिंडीत वाटसरुंना लुटत असे, असंही मानतात. याच खिंडीनं वाल्याच कोळीचे वाल्मिकी ऋषी झालेले पाहिले. खिंडीतून पावलं पडत असताना, हा पुराण संदर्भही मनाच्या वाटेवर जरूर होता.
- शंकर टेमघरे

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India