राज्यातील बहुतांश भागातून आलेल्या संतांच्या पालख्या वाखरीत मुक्कामी होत्या. वारकऱ्यांच्या दृष्टिने हा मोठाच योगायोग होता. पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह होता. पहाटेपासून लगबग सुरू होती. आज पंढरपूर येणार या आशेने सारे उत्साहीत होते. मी एका वारकऱ्याला विचारलं, काय बाबा झाली का वारी? त्यावर बाबा म्हणाले, "हो, आज व्हईल की. पर वारीतंला आनंद आता पुढच्याच वर्षी. त्यांना वारी संपल्याची हूरहूर मलाही बोलताना जाणवली होती. त्यामुळं मी पुन्हा विचारलं, मग आता घरी कधी? ते म्हणाले, जायचं ना बारस सोडूनं. घरी काय शेती आहे, का विचारलं? ते म्हणाले, दहा बारा एकर हायं. पंधरा दिवस घरचं काय आढवलं नाय. आता एक एक आढवयाला लागलं. घरी असतो, तर पाण्याचा (पावसाची) घोर लागला असता. पर वारीत चाललो, तर कशाचीच काळजी नव्हती.
होय.. अशी माझ्यासह साऱ्यांचीच अवस्था आज होती. वारीत चालताना खरोखर वार, तारीख आठवत नव्हतं. आज पंढरीत जायचा आनंद तर होताच पण वारी संपल्याचं दुःखही होतं. सतरा -अठरा दिवस अनुभवलेला आनंद शब्दात सांगणं शक्‍यच नाही. आ मच्यातही वारी संपल्याची चर्चा होती. आमच्यातील कोणी स्पष्ट बोलून दाखवलं नसलं तरी मनात हूरहूर होतीच.

पत्रकार पडतात जेव्हा तोंडघसी
पुष्पवृष्टी होणार असल्याची माहिती वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांना दिली होती. तशी चौकट सर्व वर्तमानपत्रांनी आजच्या बातमीत केली होती. आम्ही पुष्पवृष्टी होणार असल्यानं सकाळपासूनच तळावर होतो. तेवठ्यात एकानं सांगितलं, पुण्यातून कळाल ंय. हॅलिकॉप्टर उपलब्ध नसल्यानं, पुष्पवृष्टीचं कॅन्सल झालयं. तेवठ्यात आमच्यातील एक जण म्हणाला, ही सुद्धा बातमी आहे. "हॅलिकॉप्टर नसल्याने वनमंत्री पाचपुते तोंडघसी' अशी बातमी होऊ शकते. गेल्या तीन वर्ष केवळ आश्‍वासनाशिवाय काहीही न करणाऱ्या पाचपुतेविषयी हा चांगला विषय मिळाल्यानं सारेच खूष होते. याबाबत आणखी काय काय करता येतील, असा विषय रं गला असतानाच. आकाशात हॅलिकॉप्टर दिसलं. आणि आमची तोंड बघण्यासारखी झाली. मनात आलं, "कसायाला गाय धारजिनी'. त्यानंतर आमच्यातील एकजण म्हणाला, "आता असं करा, पुष्पवृष्टी झाल्यानं पत्रकार तोंडघसी', त्यानं असं सांगताच आमच्यात हस्यकल्लोळ उडाला.

पालख्यांवर पुष्पवृष्टी
आम्ही सारे पुष्पवृष्टी पाहण्यासाठी बाहेर आलो. तर हॅलिकॉप्टर फार पुढं गेलं. नंतर नंतर तर ते दिसेनासे झालं. आमच्या आशा पुन्हा उंचावल्या. पण काही वेळातचं ते पुन्हा पालख्यांच्या दिशेने आलं. त्यातून पुष्पवृष्टी झालीं. फुले माऊलींच्या तंबूवर पडली. अन्‌ टाळ्याचा कडकडाट झाला. उपस्थितांनी माऊली- माऊलीचा जयघोष केला. दहा- बारा घिरट्या घालताना त्यानं तुकाराम महाराजांसह विविध संतांच्या पालख्यांवर पुष्पवृष्टी केली. हा सारा प्रकार वारकऱ्यांच्या दृष्टिने वारकऱ्यांना तसा नवीनचं. त्यामुळं त्याबाबत उत्सुकता होती. मागील वर्षी वारीत सहभागी झालेले जुने वारकरी नव्याना मोठ्या उत्साहाने हॅलिकॉप्टरबाबत सांगताना दिसत होते.
सकाळपासून तलावर पंगती पडत होत्या. अकरानंतर ट्रक पंढरपूरमध्ये सोडणार नसल्याचं पोलिसांनी जाहीर केल्यानं साडेआठपासून ठिकठिकाणी जेवणाच्या पंगती पडल्या होत्या.

माऊलींच मागे का?
माऊलींची पालखी एक वाजता निघणार होती. मात्र, उशीर झाल्यानं मी विचारलं उशीर का, तर मला सांगण्यात आलं. तुकोबाराय निघायचे आहे. अर्ध्या तासाच्या उशिरानंतर दुपारी दीड माऊलींची पालखी निघाली. तुकोबारायांची पालखी दोनला निघाली. तोपर्यंत माऊलींची पालखी त्याच परिसरात होती.त्यावेळी एका नियोजनातील एका ज्येष्ठ मानकऱ्याला मी विचारलं. तुकोबाराय उशीरा निघणार आहेत, तर मगं आपण पुढं जायला काय हरकत आहे. त्यावर ते सांगू लागले. ज्ञानोबारायांना माऊली का म्हणतात. तर ती सर्वांची आई आहे. त्यामुळे सर्व संताना पुढं घेऊन मग माऊली मागून चालते. त्याचं हे उत्तर माझ्या दृष्टिनं नवं होतं. त्यासाठी किती उशीर लागला तरी चालेल, शेवटच्या टप्प्यात आई साऱ्या संतांना घेऊन विठुरायाच्या नगरात जाते. ही बाब मला दहा वर्षांच्या काळातही माहित नव्हती.

अखेरच्या रिंगणाने उधाण
पंढरी समिप आल्यानं वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. कधी एकदा पंढरपूर येतंय. निम्मे अर्धे वारकरी तर दुपारीच पं ढरीत दाखल झाले होतं. वाखरी- पंढरपूर या दरम्यानचा रस्त्यावर अक्षरशा जनजागर उसळला होता. पालखी विसबावीला आली. तेथे सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण असल्याने तातडीने चोपदारांनी रिंगण लावून घेतले. काही सेंकदात अश्‍वांनी रिंगण पूर्ण केले. पंढरीच्या उंबऱ्यावर आल्याचा आनंद आणि अश्‍वांनी रंगविलेलं रिंगण यामुळे वारकऱ्यांच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता. बाळासाहेब चोपदार यांनी चोप उंचावताच आवाज बंद झाला. आरतीनंतर रिंगणाची सांगता झाली.

गळ्यात पादुका घेऊन वाटचाल
रिंगणानंतर सर्वांत महत्त्वाचा सोहळा असतो तो शितोळे सरकार गळ्यात पादुका घेऊन वारीची वाट चालतात, तो. परंपरेनुसार रिंगण संपल्यावर मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात पादुका दिल्या. त्यानंतर एका बाजूला वीना घेऊन राजाभाऊ आरफळकर आणि दुसऱ्या बाजूला टाळ घेऊन वासकरमहाराज चालू लागले. हा सोहळा बघताना ुुवारकरी भावूक झाले होते. आम्हीही त्याला अपवाद नव्हते. साऱ्यांच्या मनात विचार एकच होता. असाच असेल का हैबतबाबांचा पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा सोहळा. भावनिक वातावणातच वाटचाल सुरू झाली. रात्री पंढरपूरमधील नाथ चौकातील ज्ञानेश्‍वर मंदिरात माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. समाजआरती झाली. आणि वारकरीही विसावले.

माऊलीपेक्षा मुख्यमंत्री महत्त्वाचे
शितोळे सरकार, आरफळकर, वासकर हे तिघे चालताना वारकऱ्यांनी तिघांना कडं केलं होतं. त्या तुलनेत या ठिकाणी हवा तेवठा बंदोबस्त नव्हता. तशी चर्चाही सुरू होती. मात्र, स्वयंशिस्तीचा हा सोहळा चालत होता. गर्दीवर दिंडीतील वारकरी नियंत्रित करीत होते. मात्र, उपस्थित जनसागराला थोपविणे अवघड होत होते. दर्शनाला आलेल्या भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केल्याने दिंड्यांना चालण्यासही जागा नव्हती. त्यावेळी एका पोलिसाला विचारलं. पोलिस कुठे आहे. वैतागून तो म्हणाला, मुख्य मंत्री आलेत, त्यांच्या बंदोबस्ताला गेलेत. दोन तीन ठिकाणी कार्यक्रम आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी बंदोबस्त लावावा लागलाय.'' सांगताना तोही पोलिस खात्याच्या कारभारावर चिडलेलाच होता. गर्दीतून वाट काढीत तिघे चालत नाथ चौकात आले. त्यावेळी माझ्या मनात आलं "विठ्ठलाच्या पुजेसाठी हॅलिकॉप्टरने आलेल्या मुख्यमंत्र्याच्या बंदोबस्ताला अधिक महत्त्व द्यायचं का अठरा दिवस मैलोनमैल पायी वाटचाल करून आलेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षेला महत्त्व द्यायचं, याचं भान पोलिस खात्याला नको का? या स्थितीत पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या धिमतीला होते. माऊलींच्या मात्र नाही. काय हा न्याय. मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्याबाबत विषय नाही. त्यांना संरक्षण हवंच. पण माऊलींपैक्षा जास्त असावं का? हे तुम्हीच सांगा. सुदैवानं आणि माऊलींच्या कृपेने म्हणा, काही लाखो भाविकांच्या गर्दीत काही अप्रिय घटना घडली नाही. अन्यथा, काय झालं असतं, याचं भान पोलिसांनाही हव होतं आणि मुख्यमंत्र्यानाही....
- शंकर टेमघरे

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India