साऱया परंपरेनुसारच गुरुवारी दुपारी अडिचच्या सुमारास निरा ग्रामस्थांनी पालखी रथात ठेवली. जुना पूल संपल्यानंतर रथ थांबला. पुल ओलांडल्यानंतर राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात पादुका देण्यात आल्या. निरा नदीवरील दत्त घाटावर त्यांनी माऊली माऊली असा जयघोष करीत, तीन वेळा पादुकांना स्नान घातले. निरेचे दोन्ही काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी उडाली होती. तीनच्या सुमारास पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. ढोल-ताशांचा दणदणाट आणि आतषबाजीत पालखीचं सातारकरांनी स्वागत केले.
पालखीचा मुक्काम लोणंदला आहे. संध्याकाळी सहापर्यंत पालखी लोणंदला पोहोचेल. तिथं अडिच दिवसांचा मुक्काम असेल.
Labels: लोणंद
वारीच्या वाटेवर निरा नदीत माऊलींच्या पादूंकांना स्नान घालण्याची परंपरा आहे. नदीच्या अलिकडे रथ थांबविण्यात येतो. पालखीतून पादूका आरफळकरांच्या हातात
दिल्या जातात. त्यानंतर दत्त घाटावर पादुकांना स्नान घालण्यात येते. हा क्षण टिपण्यासाठी हजारो भाविकांनी दोन्ही तीरांवर गर्दी केलेली असते. ज्ञानोबा-तुकारामांचा
जयघोष सुरू असतो. आरफळकरांच्या हस्ते पादुकांना स्नान घालण्यात येते.
पालखीनं या काळात आठवडाभराचा प्रवास केलेला असतो. बहुतांश पुणे जिल्ह्यातील भाविक पालखीला इथं निरोप देतात. इथून पुढं सातारा जिल्हा सुरू होणार असतो. माऊलींच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्यातील भाविक दुसऱया तीरावर सज्ज असतात. हैबतबाबा आरफळकर सातारा जिल्ह्यातील. त्यामुळेही सातारा जिल्ह्यात अमाप उत्साह असतो. पाडेगाव तालुक्याच्या हद्दीत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सोहळ्याचं स्वागत करण्यात येतं. महसूल, आरोग्य आणि पोलीस विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या पथकांना इथे निरोप दिला जातो आणि सातारा जिल्ह्यातील पथकांचं स्वागत करण्यात येतं.
निरोप आणि स्वागताचा हा सोहळा पालखीच्या एकूण वाटेवरचा एक आगळा सोहळा ठरतो. आत्ताही, थोड्या वेळात पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. आणि हा सोहळा आणखी एकदा अनुभवता येईल...
Labels: वाल्हे
माऊलींच्या पालखीनं गुरुवारी सकाळी प्रतिक्षा अनुभवली...! मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी सौ. वैशाली देशमुख पालखी सोहळ्याला येणार, असा निरोप प्रशासनाला होता. वाल्हे मुक्कामी प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली. महसूल खात्यातून निरोप होता. गृहखातेही दक्ष झाले. पोलीस खात्यातले वरीष्ठ अधिकारी पालखीच्या मुक्कामी हजर झाले.
सकाळी सातची पालखीची प्रस्थानाची वेळ सहसा चुकत नाही. सात वाजून गेले, तरी अजून सौ. वैशाली देशमुख नव्हत्या आल्या. अख्ख्या सोहळ्याचे डोळे प्रस्थानाकडे लागले होते. वीसेक मिनिटांनंतर मोटार आली, ती मुख्यमंत्र्यांचे बंधू आमदार दिलीपराव देशमुख यांच्या पत्नींची !
नेमका हा निरोपाचा घोटाळा होता की आणखी कशाचा, हे काही समजू शकले नाही. पण, पालखी सोहळा मात्र घोटाळ्यात पडला हे निश्चित !
दरम्यान, हा घोटाळा संपल्यावर पालखी मार्गस्थ झाली. लोणंदच्या मुक्कामासाठी निघाली. साडे नऊच्या सुमारास पिंपळे खुर्द इथं विसाव्यासाठी थांबली.
Labels: वाल्हे
आळंदी ते पंढरपूर या दरम्यान माऊलींच्या पालखीची दुपारी आरती होणारं वाल्हे हे एकमेव गाव. समाजआरती म्हणजे काय? ही का केली जाते? याबाबत थोडसं सांगावं वाटतं.
पालखी सोहळ्याचे संस्थापक हैबतबाबा आरफळकर (साधारण 1832 चा काळ) हे कडक शिस्तीचे होते. त्यांची शिस्त सोहळ्यात पुरेपूर उतरली. त्यामध्ये निघण्याची वेळ, विसावा, मुक्कामाची ठिकाणे आणि समाजआरती यांचा प्रामुख्यानं समावेश असतो. समाजआरतीला वारीत मानाचं स्थान आहे. दिवसभराची वाटचाल संपून मुक्कामाच्या ठिकाणी देवाच्या तंबूसमोर पालखी आणण्यात येते. त्यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमतात. गोलाकार दिंड्या ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करीत असतात. गर्दीतून वाट काढीत पालखी मध्यभागी येते. दरम्यानच्या काळात भजनाचा सूर टिपेला पोहोचलेला असतो. तेवढ्यात चांदीचा चोप उंचावतो आणि चोपदार हो हो हो अशी आरोळी ठोकतो.
चोप उंचावला रे उंचावला की क्षणार्धात टाळ-मृदंगाचा गजर बंद होतो. मात्र, त्यानंतरही टाळ-भजन सुरू राहिल्यास संबंधित दिंडीची काही तक्रार आहे, असे समजले जाते. दिवसभराच्या वाटचालीत अथवा मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित दिंडीला अडचणी आल्या, तर अशा पद्धतीने टाळ वाजवून तक्रार नोंदविण्याची समाजआरतीत प्रथा आहे. अशी पद्धत बहुधा फक्त वारीतच अनुभवाला येते. त्यानंतर संबंधित दिंडीची अडचण समजावून घेण्यासाठी चोपदार त्या दिंडीजवळ जातात. त्यांची अडचण समजावून घेतल्यानंतर त्यांचे टाळ थांबतात. हा सर्व आवाज बंद झाल्यानंतर हरविलेल्या वस्तूंची यादी वाचण्यात येते. सापडलेल्या वस्तुंचीही यादी वाचली जाते. ओळख पटवून देवाच्या तंबूजवळून या वस्तू घेऊन जाव्यात, अशी सूचना केली जाते. त्यामध्ये ओळखपत्रापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंतच्या चीज-वस्तूंचा समावेश असतो. हे सर्व झाल्यानंतर दिवसभराच्या वाटचालीत दिंड्यांमधील वारकऱयांनी पाळावयाचे नियम सांगण्यात येतात. प्रसंगी कारवाईचा इशाराही दिला जातो. त्यानंतर दुसऱया दिवशीची निघण्याची वेळ जाहीर करण्यात येते. आरती होऊन पालखी तंबूत विसावते.
शिस्तीच्या या प्रक्रियेला समाजआरती म्हणतात. दरवर्षी ठरल्याप्रमाणं प्रत्येक मुक्कामाला ही समाजआरती होते. समाजआरती झाल्याशिवाय दिंडीत चालणारा वारकरी खाली बसत नाही.
बुधवारी वाल्हेत अशीच समाजआरती झाली. केवळ एका नव्या गोष्टीचा समावेश त्यात झाला. तो तेथील तळ नवा होता. वारीच्या सोहळ्याच्या संख्येमुळे देवस्थान आणि मानकऱयांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाबाहेर मोकळ्या जागेत यंदा तळ हलविला आहे. आता तीस एकरावर माऊलींचा तळ सजला आहे.
- शंकर टेमघरे
Labels: वाल्हे
दुपारी अडिच वाजता माऊलींची पालखी वाल्हे मुक्कमी पोहोचली. आठ किलोमीटरची वाटचाल सहज पार पडली. पालखी पोहोचल्यावर समाजआरती झालीय. आता वारकरी विश्रांती घेत आहेत.
थोड्यावेळानं आपण बोलू समाजआरतीविषयी.
Labels: वाल्हे
या अभंगाचा प्रत्यय त्याच क्षणी आला.
खरं म्हणजे दरवर्षी दौंडज खिंड हिरवीगार दिसते. यावर्षी पाऊस कमी झालाय. खिंडीचा परिसर काहीसा सुनासुना दिसतोय. हिरवी छटा जरूर आहे, पण दरवर्षी इतका, हिरवा गार गालिचा नाहीय. पालखीचा जथ्था चालत असताना शेजारूनच मालगाडी धडधडत गेली. अध्यात्म आणि आधुनिकतेच्या प्रवाहाचा संगम दाखवणारे हे देखणं दृश्य होतं.
सकाळच्या विसाव्यापर्यंत पावसाचं चिन्हं नव्हतं. उलट थोडसं उन्हंही होतं. विसावा संपतानाच जोरदार सर आली आणि वारकऱयांना चिंब करून गेली. पालखी दौंडज गावामध्ये साडे अकराच्या दरम्यान पोहोचली.
वाल्हे गाव वाल्मिकी ऋषींचं, असं मानतात. वाल्मीकी ऋषी वाल्या कोळी असताना, याच दौंडज खिंडीत वाटसरुंना लुटत असे, असंही मानतात. याच खिंडीनं वाल्याच कोळीचे वाल्मिकी ऋषी झालेले पाहिले. खिंडीतून पावलं पडत असताना, हा पुराण संदर्भही मनाच्या वाटेवर जरूर होता.
- शंकर टेमघरे
Labels: वाल्हे
माऊलींच्या पालखीनं मंगळवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान जेजुरीच्या हद्दीत प्रवेश केला. ढगाळ वातावरण होतं, पण पाऊस नव्हता. पालखी दाखल होताच, भक्तांनी भंडाऱयाची उधळण केली. पालखी भंडाऱयानं अक्षरशः भरून गेली होती. जेजुरीच्या हद्दीत येताच वारकऱयांनी मल्हारी मार्तंडाच्या अभंगांचा ताल धरला होता.
बुधवारी, दोन जुलैला मुक्काम आहे वाल्हे इथं. मागच्या वर्षी वाल्हेत गावकऱयांनी गुढ्या उभा करून स्वागत केलं होतं पालखीचं. यावर्षीच्या स्वागताची उत्सुकताही आहे वारकऱयांमध्ये.
वाल्हेचा नेहमीचा तळ यावर्षी बदलला आहे. बुधवारी नव्या तळावर पालखी जाणार आहे. गावापासून एक किलोमीटरवर नवा तळ आहे.
बुधवारचा टप्पा फक्त आठ किलोमीटरचा. माऊलींच्या वारीचा हा सर्वात छोटा टप्पा. त्यामुळं दुपारीच वारी वाल्हेत पोहचेल आणि मग समाजआरती होईल. समाजआरती पाहण्याची ही सगळ्याच चांगली संधी.
Labels: जेजुरी
शकुरची वारी
मंगळवारी सकाळच्या वाटचालीत दिंड्यामधून अंभग सुरू झाले होते. हो, अभंगावरून एक आठवलं, राज्याच्या जवळपास सगळ्या भागातून वारीच्या वार्तांकनासाठी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे पत्रकार, छायाचित्रकार वारकरीच झालेले असतात. आम्ही सर्वांनी मिळून पालखी सोहळा पत्रकार संघही स्थापन केलाय. आमच्या या पत्रकार दिंडीबाबत आपण नंतर विस्ताराने बोलू...
सांगायची गोष्ट आहे, ती सोलापूरच्या शकुर तांबोळीची. तो छायाचित्रकार. तीन वर्षांपूर्वी पालखी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे यांनी आळंदीत शकुरशी ओळख करुन दिली. क्षणभर मला प्रश्न पडला, "हा मुस्लिम मुलगा. वारीच्या वाटेवर चालणार का?' ही शंका अगदी पहिल्याच झटक्यात शकुरनं दूर केली, त्याच्या स्वभावानं आणि आत्मियतेनं. वारीत चालताना एखाद्या फोटोसाठी धावपळ करण्याची वेळ आल्यास शकूर अगदी प्रेमानं "माऊली- माऊली' म्हणतं वारकऱ्यांमधून वाट काढायचा. पाच- सहा दिवस चालल्यानंतर शकूरशी चांगली मैत्री झाली. शकूरला माऊलींबद्दल, या एकूण सोहळ्याबद्दल काय वाटतंय, याची मला उत्सुकता होती. त्याच्याच तोंडातून त्याच्या भावना ऐकायच्या होत्या. पण जीभ रेटेना. त्याला थेट विचारलं, तर काय वाटेल?....माझ्या बोलण्याचा त्याला राग तर येणार नाही ना? असे अनेक प्रश्न मनात घोळत होते.
आठवडाभराचा अवधी गेला. वारी अंतिम टप्प्यात असताना आमचा मुक्काम अकलूजला होता. त्यावेळी सर्व सहकारी बातम्या फॅक्स करायला गेले होते. शकूर आणि मी विश्रामगृहावर होतो. या विषयावर बोलायचंच, असं मी ठरवलं. त्याला म्हणालो, "काय हा वारीचा सोहळा आहे...सगळी जण वय, जात, भेद विसरून चालतात...'. त्यावर तो म्हणाला, "शंकरराव, हे जग अजबच आहे.' मात्र, त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं. अखेर मी त्याला मला हवा असणारा प्रश्न केला. "शकूर तुला वारीला यावसं का वाटलं?'
त्यावर तो म्हणाला, "मी पंढरपूरच्या अनाथाश्रमात शिकलो. त्यावेळी वारकरी मंडळी पंढरपूरला यायची. त्यांच्याबद्दल मला कमालीचा आदर वाटायचा. आपल्याला वारीत सहभागी होता येईल का? अशी मनोमन इच्छा व्हायची. सुफीपंथांच्या आमच्या गुरुंनी आम्हाला सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली होती. धर्म, जात- पात कोणता देव ठरवत नाही, तर आपण ठरवतो, ही ती शिकवण होती. तोच विचार माझ्या मनात होता. पुढे अकलूजला आल्यानंतर फोटोग्राफीच्या व्यवसायात काम करु लागलो. एका वर्तमानपत्राने मला वारीचे फोटो काढण्यासाठी जाणार का? अशी विचारणा केली. त्यावेळी मला सर्वाधिक आनंद झाला होता. त्याक्षणी मी "होय' म्हणून सांगितलं. त्यानंतर दरवर्षी मी वारीत चालतो. त्यातून मला अनेक चांगले अनुभव आले. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. वारीत आपल्याकडून दररोज वीस-बावीस किलोमीटर चालणं होतं. दिंडीत अभंग म्हणत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सहवासाचा आनंद मिळतो.'
हाच शकूर यंदाही वारीत चालतोय. आणि चालताना वारकऱ्यांबरोबर अभंगही गुणगणतोय. जातीभेदाच्या भिंतीपार हा आनंदसोहळा आहे, हे त्या अभंगातून पावलोपावली जाणवतोय...
- शंकर टेमघरे
Labels: जेजुरी
मंगळवारी भल्या पहाटेच सोहळ्याला जाग आली. दोन दिवसांच्या विसाव्यानंतर मोठ्या उत्साहात सकाळी सोहळा चालू लागला. सासवडकरांचा निरोप घेऊन वारकरी मंडळी जेजुरीकडे मार्गस्थ झाली आहेत. अधूनमधून पावसाची रिमझिम सुरू आहे. अठरा किलोमीटरची वाटचाल करण्यासाठी पावले सरसावली आहेत. आता, माऊलींची पालखी बोरावके मळ्यात पहिल्या विसाव्याला थांबली. हिरव्यागार रानमाळावर ग्रामस्थांनी न्याहारी (नाष्टा) केला. अधूममधून सूर्याचे दर्शन आणि रिमझिम सरी, असा माहौल आहे. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर सोहळा मार्गस्थ झालाय. दिंड्यामधून अंभग सुरू झाले आहेत. पावलांचा वेग वाढत आहे.
Labels: जेजुरी
Labels: सासवड

