जरी आला पाऊस सोबतीला...
माऊलींच्या लवाजम्याचा सोमवारी सासवडला मुक्काम. रविवारी एकतीस किलोमीटरची सर्वात मोठी वाट मागे टाकून ही मंडळी सोपानदेवाच्या नगरीत विसावली. रविवारी सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला. अवघड दिवे घाट ओलांडला की, पंढरपूर आलचं, अशी वारकऱ्यांची भावना असते. रात्री दमली- भागलेली पावलं तंबूमध्ये विसावली.
वारीचा हा सोहळा असतो तो पावसाळ्यात. वारीत सहभागी होणारेही बहुतांश शेतकरी असतात. त्यामुळे वारीत पाऊस ही बाब वारकऱ्यांसाठी नवी नाही. ज्या गावात पालखी रात्री जाणार असेल. तेथे सकाळपासून पाऊस झाला की, वारकऱ्यांचे हाल होणार हे निश्चित.
एकदंरीतच वारीतील निवाऱ्याबाबत स्पष्टीकरण करतो. वारीत दिंड्याच्या निवाऱ्याची व्यवस्था असते. प्रत्येक दिंडीची मुक्कामाच्या प्रत्येक गावात जागा निश्चित असते. वारीत दिंड्यांमधील वारकऱ्यांची सकाळी होते पहाटे तीनला. तीन वाजता "तंबू पाडा, तंबू पाडा' अशी आरोळी ठोकली जाते. त्यानंतर तंबूतून बाहेर यावंच लागतं कारण, पाच-दहा मिनिटांनंतर तंबू काढण्यात येतो. तंबूचा ट्रक पहाटे चारच्या सुमारास पुढील गावाच्या प्रवासाला निघते. वारकऱ्यांची वाटचाल सुरू होण्यापूर्वी या सर्व दिंड्यांचे ट्रक पुढील गावाच्या दिशेने जातात. गर्दीतून वाट काढीत ट्रक दुपारी बारा एकच्या सुमारास पुढील गावात पोहोचतात. दरवर्षीच्या ठिकाणी तंबू ठोकणाऱ्या टीमकडून तंबू ठोकले जातात. प्रश्न येतो पावसाचा. तंबू ठोकण्यापूर्वी पाऊस झाला असल्यास वारकऱ्यांना गारठ्यावर झोपण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, तंबू टाकल्यानंतर पाऊस आला, तर तंबूत पाणी येण्याची शक्यता नसते. कारण तंबूच्या सर्व बाजूने पाणी जाण्यासाठी जागा केलेली असते. मात्र, तंबूची जागा उताराला असल्यास पर्याय नसतो.
दोन वर्षांपूर्वी माऊलींची पालखी निघण्याच्या अगोदर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस होता. त्यानंतर तो पाऊस सलग आठवडाभर होता. पुण्यात पाऊस असताना, वारकऱ्यांचे तेवढे हाल झाले नाही. मात्र, सासवड मुक्कामाला दिंड्यांच्या तंबूनी पावसात तंबू टाकले. सर्व तंबूमध्ये पाणी होतं. दरम्यानच्या काळात पावसाचा जोर वाढल्याने तंबूमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती, साडेनऊनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. एकतीस किलोमीटरची वाटचाल चालून आल्यानंतर रात्री झोप नाही ही, कल्पनाही आपण सहन करू शकत नाही. अशा स्थितीत बहूतांश दिंड्यांमध्ये वारकऱ्यांनी जागून रात्र काढली. त्यामानाने यंदा सासवडला पाऊस झालाय, तो दोन वर्षापूर्वीइतका नाही हे खरं.
- शंकर टेमघरे
Labels: सासवड
पंढरीची वारी निरंतर चालणारा सांस्कृतिक महोत्सव आहे. तुमच्या उपक्रमाचं स्वागत आहे. मला वाटतं, की प्रत्यक्ष वारीत काय चाललंय, हे जास्त यावं येथे.