सायंकाळी सात वाजताआज भल्या पहाटेच वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली. दोन दिवसांचा विसावा घेतल्यानं उल्हासित झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी सहाला मार्गस्थ झाली. रथाच्या मागं आणि पुढं क्रमानुसार दिंड्या लागल्या. पुणे- सोलापूर महामार्गावर दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. एकादशी असल्याने आज फराळाच्या पदार्थांचं ठिकठिकाणी वाटप सुरू होतं. सकाळपासून वारकऱ्यांची वाटचाल वेगानं सुरू होती. वारीच्या वाटेतील सर्वांत मोठी 31 किलोमीटरची ही वाटचाल. त्यात आज एकादशी आणि वाटचालीत अवघड दिवे घाट. या साऱ्या अडचणींवर मात करीत "विठुरायाच्या नामघोषा'त ही मोहीम सर करण्याचा उत्साह वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर सकाळपासूनच होता. पावलं झपझप चालत होती. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या शिडकाव्यात अवघा सोहळा न्हाऊन निघत होता.

गेल्या काही वर्षांपासून पुणे ते सासवड प्रवासात पुणेकर मोठ्या संख्येनं सहभागी होताना दिसून येतात. मुला- मुलींचे जथ्थेच्या जथ्थे वारीत चालतात. पायात बूट, जीन्स, टीशर्ट, टोपी, पाठीवर सॅल अशा वेषात मार्गक्रमण करणारी ही तरुणमंडळी नामस्मरण करताना दिसली, तर नवलंच. फक्त पंढरीच्या वाटसरुंबरोबर चालण्याचा आनंद घेणं एवढाच काय तो उद्देश, आणि आपण तीस किोलमीटर चालू शकतो, हा आत्मविश्‍वास...

मगरपट्ट्याजवळ भेटलेला पुण्यातील दीपक साठे बोलत होता, ""तीन वर्षांपूर्वी आम्ही तिघा मित्रांनी सासवडपर्यंत चालण्याचा बेत आखला. पहिल्या वर्षी चालण्यास सुरवात केली, तेव्हा वेडेपणा वाटला. मात्र, दिवेघाटापर्यंत कसे गेलो, हे समजलंही नाही. त्या वर्षी आम्ही दिवेघाटाच्या पायथ्यापासून परत फिरलो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही पुणे ते सासवड या प्रवासाचे वारकरीच झालो आहोत. वारीच्या वाटेवर वारकऱ्यांचा उत्साहच आमच्या पायात बळ देतो.''

अशीच एक तरुणी सुनंदा पवार म्हणाली, ""आम्ही सहाजणी गेल्या चार वर्षांपासून पुणे- सासवड हे अंतर चालतो. माझे वडील वारकरी असल्यानं मला वारीबाबत आत्मियता होतीच. वारीत चालावं, असं खूपदा वाटायचं. या इच्छेखातर मी मैत्रिणींना दिवेघाटापर्यंत चालत जाण्याची गळ घातली. पहिल्या वर्षी भवानीपेठ ते हडपसरपर्यंत चालयचं ठरलं, आणि साडेसहाच्या सुमारास वाटचाल सुरू झाली. पहिलंच वर्ष असल्यानं रस्त्याच्या कडेनं चालायचं ठरलं. दोन तासांमध्ये हडपसरला आलो. पण, आमचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. त्यामुळं आणखी पुढं जाण्याचा निर्णय घेतला. त्यासरशी थबकलेली आमची पावले पुन्हा चालू लागली. दीडच्या सुमारास आम्ही दिवेघाटाच्या पायथ्याशी पोहोचलो. तेथून परत फिरण्याचा निर्णय घेतला. अडीचच्या सुमारास पालखी वडकी नाल्यातून दिवे घाटाकडे मार्गस्थ झाली. पालखीने पुढची वाटचाल सुरू केल्यानंतर आम्हीही पुण्याकडे वळलो. पालखी सोहळ्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे हडपसरपर्यंत पायपीट करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आम्ही हडपसरच्या दिशेनं चालू लागलो. परतीचा प्रवास अगदीच एकाकी होता. ना सोबतीला पालखी सोहळा, ना टाळ मृदंगाचा गजर...अतिशय रुक्ष स्वरूपाचा हा उलटा प्रवास होता. अवघा अर्धा ते एक किलोमीटर अंतर चालल्यानंतर आम्हाला तो एकटेपणा आणखी भेडसावू लागला. पाय थकल्यानं आता जायचं तर गाडीनंच, असं पक्क करून आम्ही एका झाडाखाली ठाण मांडलं. दरम्यानं एक वाहन दिसलं. त्यातूनच मग आम्ही हडपसरपर्यंत प्रवास केला. थोडक्‍यात काय, तर वारीच्या वाटेवर चालणारी भजने, पंढरीच्या दिशेने जाणारा वैष्णवांचा प्रवाह आम्हाला बळ देत असल्याचा प्रत्यय आला...त्यानंतर गेली तीन वर्षे आम्ही पुणे ते सासवड अशी एकदिवसाची वारी चालतो. यात कोणताही खंड पाडायचा नाही, असा निर्धार मात्र नक्की केलाय...

या तरुणांशी संवाद साधलाय शंकर टेमघरे यांनी...

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India