आषाढी वारीसाठी उभा महाराष्ट्र पंढरीची वाट चालू लागलाय. माऊलींची आणि तुकोबारायांची पालखी शुक्रवारी, सत्तावीस जूनला पुणे मुक्कामी दाखल झालीय. या दोन्ही पालख्यांसमवेत पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाला भेटायला निघालेल्या हजारो वारकऱयांचं पुणेकरांनी भक्तीभावानं स्वागत केलंय. शहरभर त्यांच्यासाठी अन्नदानाचा उपक्रम राबवलाय.

पिठलं-भाकरीपासून ते बासुंदीपर्यंतचे बेत वारकऱयांसाठी आखले गेले. दोन दिवसांच्या मुक्कामामुळं वारकऱयांना आजचा, शनिवारचा दिवस दिंडीसाठी लागणाऱया चीज-वस्तूंच्या खरेदीत घालवला. तुळशीबाग, लक्ष्मीरोड, नाना पेठ, भवानी पेठ, रास्ता पेठ, सोमवार पेठ, बुधवार पेठे, शुक्रवार पेठ या ठिकाणी वारकऱयांचे जथ्थेच्या जथ्थे फिरत होते. राहूट्या, शाळा आणि मोकळ्या जागांवर दिंड्यांनी मुक्काम ठोकलाय. दुपारच्या खमंग जेवणानंतर भुरभूर पावसातही वारकऱयांनी आडोसा शोधून निवांत विश्रांती घेतली.

1 comments:

  1. Anonymous said...

    excellent blog. 1st time seen at such level the "wari" shared on wwww. keep up the good work! appreciate again as the real 'warkari' will be happy if they see this!  


 

Sakaal Media Group, Pune, India