सोमवारी दुपारी तीननंतर पावसाने उसंत घेतलीय. जेवण केल्यानंतर वारकऱ्यांनीही विसावा घेतला होता. संध्याकाळी पाचनंतर तंबूंमधून हरिपाठ सुरू झाले आहेत. माऊलींचा सासवडमध्ये दोन दिवस मुक्काम. त्यामुळे पुरंदर तालुक्‍यातील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी एकच गर्दी केलीय. लांबच लांब रांगा लावून भाविक माऊली चरणी लीन होत आहेत. मनात साठवावा, असा हा भक्तीचा उत्सव सर्वत्र दाटून आलाय.

मंगळवारी, एक जुलैला सकाळी साडेसहाला पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होणार आहे. अठरा किलोमीटरची वाटचाल करून ही विठुरायाची ही मांदियाळी रात्री मल्हारी मार्तंडाच्या सोन्याच्या जेजुरीत विसावेल.

- शंकर टेमघरे

जरी आला पाऊस सोबतीला...
माऊलींच्या लवाजम्याचा सोमवारी सासवडला मुक्काम. रविवारी एकतीस किलोमीटरची सर्वात मोठी वाट मागे टाकून ही मंडळी सोपानदेवाच्या नगरीत विसावली. रविवारी सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला. अवघड दिवे घाट ओलांडला की, पंढरपूर आलचं, अशी वारकऱ्यांची भावना असते. रात्री दमली- भागलेली पावलं तंबूमध्ये विसावली.

वारीचा हा सोहळा असतो तो पावसाळ्यात. वारीत सहभागी होणारेही बहुतांश शेतकरी असतात. त्यामुळे वारीत पाऊस ही बाब वारकऱ्यांसाठी नवी नाही. ज्या गावात पालखी रात्री जाणार असेल. तेथे सकाळपासून पाऊस झाला की, वारकऱ्यांचे हाल होणार हे निश्‍चित.

एकदंरीतच वारीतील निवाऱ्याबाबत स्पष्टीकरण करतो. वारीत दिंड्याच्या निवाऱ्याची व्यवस्था असते. प्रत्येक दिंडीची मुक्कामाच्या प्रत्येक गावात जागा निश्‍चित असते. वारीत दिंड्यांमधील वारकऱ्यांची सकाळी होते पहाटे तीनला. तीन वाजता "तंबू पाडा, तंबू पाडा' अशी आरोळी ठोकली जाते. त्यानंतर तंबूतून बाहेर यावंच लागतं कारण, पाच-दहा मिनिटांनंतर तंबू काढण्यात येतो. तंबूचा ट्रक पहाटे चारच्या सुमारास पुढील गावाच्या प्रवासाला निघते. वारकऱ्यांची वाटचाल सुरू होण्यापूर्वी या सर्व दिंड्यांचे ट्रक पुढील गावाच्या दिशेने जातात. गर्दीतून वाट काढीत ट्रक दुपारी बारा एकच्या सुमारास पुढील गावात पोहोचतात. दरवर्षीच्या ठिकाणी तंबू ठोकणाऱ्या टीमकडून तंबू ठोकले जातात. प्रश्‍न येतो पावसाचा. तंबू ठोकण्यापूर्वी पाऊस झाला असल्यास वारकऱ्यांना गारठ्यावर झोपण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, तंबू टाकल्यानंतर पाऊस आला, तर तंबूत पाणी येण्याची शक्‍यता नसते. कारण तंबूच्या सर्व बाजूने पाणी जाण्यासाठी जागा केलेली असते. मात्र, तंबूची जागा उताराला असल्यास पर्याय नसतो.

दोन वर्षांपूर्वी माऊलींची पालखी निघण्याच्या अगोदर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस होता. त्यानंतर तो पाऊस सलग आठवडाभर होता. पुण्यात पाऊस असताना, वारकऱ्यांचे तेवढे हाल झाले नाही. मात्र, सासवड मुक्कामाला दिंड्यांच्या तंबूनी पावसात तंबू टाकले. सर्व तंबूमध्ये पाणी होतं. दरम्यानच्या काळात पावसाचा जोर वाढल्याने तंबूमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती, साडेनऊनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. एकतीस किलोमीटरची वाटचाल चालून आल्यानंतर रात्री झोप नाही ही, कल्पनाही आपण सहन करू शकत नाही. अशा स्थितीत बहूतांश दिंड्यांमध्ये वारकऱ्यांनी जागून रात्र काढली. त्यामानाने यंदा सासवडला पाऊस झालाय, तो दोन वर्षापूर्वीइतका नाही हे खरं.

- शंकर टेमघरे

रविवारच्या बत्तीस किलोमीटरच्या पायपीटीनं थकलेल्या वारकऱयांना सोमवारी सकाळपासून पावसाच्या रिपरिपीमुळं विश्रांती मिळाली आहे. सोमवारी सकाळपासून वारीच्या मार्गावर पाऊस सुरू आहे. पावसाला जोर नाही. त्यामुळे, वारकऱयांच्या तंबूत पाणी शिरलेले नाही. जोर वाढला, तर वारकऱयांचे हाल होतील, ही भीती आहे. सोमवारी माउलींची पालखी सासवडला मुक्काम करणार आहे.


सायंकाळी सात वाजताआज भल्या पहाटेच वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली. दोन दिवसांचा विसावा घेतल्यानं उल्हासित झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी सहाला मार्गस्थ झाली. रथाच्या मागं आणि पुढं क्रमानुसार दिंड्या लागल्या. पुणे- सोलापूर महामार्गावर दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. एकादशी असल्याने आज फराळाच्या पदार्थांचं ठिकठिकाणी वाटप सुरू होतं. सकाळपासून वारकऱ्यांची वाटचाल वेगानं सुरू होती. वारीच्या वाटेतील सर्वांत मोठी 31 किलोमीटरची ही वाटचाल. त्यात आज एकादशी आणि वाटचालीत अवघड दिवे घाट. या साऱ्या अडचणींवर मात करीत "विठुरायाच्या नामघोषा'त ही मोहीम सर करण्याचा उत्साह वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर सकाळपासूनच होता. पावलं झपझप चालत होती. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या शिडकाव्यात अवघा सोहळा न्हाऊन निघत होता.

गेल्या काही वर्षांपासून पुणे ते सासवड प्रवासात पुणेकर मोठ्या संख्येनं सहभागी होताना दिसून येतात. मुला- मुलींचे जथ्थेच्या जथ्थे वारीत चालतात. पायात बूट, जीन्स, टीशर्ट, टोपी, पाठीवर सॅल अशा वेषात मार्गक्रमण करणारी ही तरुणमंडळी नामस्मरण करताना दिसली, तर नवलंच. फक्त पंढरीच्या वाटसरुंबरोबर चालण्याचा आनंद घेणं एवढाच काय तो उद्देश, आणि आपण तीस किोलमीटर चालू शकतो, हा आत्मविश्‍वास...

मगरपट्ट्याजवळ भेटलेला पुण्यातील दीपक साठे बोलत होता, ""तीन वर्षांपूर्वी आम्ही तिघा मित्रांनी सासवडपर्यंत चालण्याचा बेत आखला. पहिल्या वर्षी चालण्यास सुरवात केली, तेव्हा वेडेपणा वाटला. मात्र, दिवेघाटापर्यंत कसे गेलो, हे समजलंही नाही. त्या वर्षी आम्ही दिवेघाटाच्या पायथ्यापासून परत फिरलो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही पुणे ते सासवड या प्रवासाचे वारकरीच झालो आहोत. वारीच्या वाटेवर वारकऱ्यांचा उत्साहच आमच्या पायात बळ देतो.''

अशीच एक तरुणी सुनंदा पवार म्हणाली, ""आम्ही सहाजणी गेल्या चार वर्षांपासून पुणे- सासवड हे अंतर चालतो. माझे वडील वारकरी असल्यानं मला वारीबाबत आत्मियता होतीच. वारीत चालावं, असं खूपदा वाटायचं. या इच्छेखातर मी मैत्रिणींना दिवेघाटापर्यंत चालत जाण्याची गळ घातली. पहिल्या वर्षी भवानीपेठ ते हडपसरपर्यंत चालयचं ठरलं, आणि साडेसहाच्या सुमारास वाटचाल सुरू झाली. पहिलंच वर्ष असल्यानं रस्त्याच्या कडेनं चालायचं ठरलं. दोन तासांमध्ये हडपसरला आलो. पण, आमचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. त्यामुळं आणखी पुढं जाण्याचा निर्णय घेतला. त्यासरशी थबकलेली आमची पावले पुन्हा चालू लागली. दीडच्या सुमारास आम्ही दिवेघाटाच्या पायथ्याशी पोहोचलो. तेथून परत फिरण्याचा निर्णय घेतला. अडीचच्या सुमारास पालखी वडकी नाल्यातून दिवे घाटाकडे मार्गस्थ झाली. पालखीने पुढची वाटचाल सुरू केल्यानंतर आम्हीही पुण्याकडे वळलो. पालखी सोहळ्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे हडपसरपर्यंत पायपीट करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आम्ही हडपसरच्या दिशेनं चालू लागलो. परतीचा प्रवास अगदीच एकाकी होता. ना सोबतीला पालखी सोहळा, ना टाळ मृदंगाचा गजर...अतिशय रुक्ष स्वरूपाचा हा उलटा प्रवास होता. अवघा अर्धा ते एक किलोमीटर अंतर चालल्यानंतर आम्हाला तो एकटेपणा आणखी भेडसावू लागला. पाय थकल्यानं आता जायचं तर गाडीनंच, असं पक्क करून आम्ही एका झाडाखाली ठाण मांडलं. दरम्यानं एक वाहन दिसलं. त्यातूनच मग आम्ही हडपसरपर्यंत प्रवास केला. थोडक्‍यात काय, तर वारीच्या वाटेवर चालणारी भजने, पंढरीच्या दिशेने जाणारा वैष्णवांचा प्रवाह आम्हाला बळ देत असल्याचा प्रत्यय आला...त्यानंतर गेली तीन वर्षे आम्ही पुणे ते सासवड अशी एकदिवसाची वारी चालतो. यात कोणताही खंड पाडायचा नाही, असा निर्धार मात्र नक्की केलाय...

या तरुणांशी संवाद साधलाय शंकर टेमघरे यांनी...

रामकृष्णहरी (नमस्कार...!)

घराच्या परिसरात मुक्कामाला असणाऱ्या वारकऱ्यांच्या गडबडीने पहाटे साडेतीनला जाग आली. खिडकीतून डोकावून पाहिले, तर घराजवळ मुक्कामाला असणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांनी नळकोंडाळ्यावर आंघोळीसाठी गर्दी केली होती. त्यामध्ये आठदहा वर्षांपासूनचे बालवारकरीही होते. अन्‌ 80, 85 वयाचे वयोवृद्ध वारकरी होते. त्यांच्यातील स्त्री- पुरुष हा भेदभाव विरून गेला होता. अंघोळ करूनच पंढरीची वाट धरण्याचा नित्यनेम निष्ठावान वारकरी पाळत असतो. त्याची प्रचिती मला आज पहाटे आली. रात्री कीर्तन संपून बारा वाजता झोपलेल्या या वारकऱ्यांना तीनच्या सुमारास उठावे लागले होते. म्हणजे त्यांना मिळाली होती अवघी तीन तासांची विश्रांती. पण, पंढरीची वाट अनुभवण्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तासाभरात सारी मंडळी तयार झाली. टाळकरी, पखवाजवादक विणेकऱ्यांनी "ज्ञानोबा- तुकाराम'चे भजन सुरू केले आणि मार्गाला लागले. आहे त्या परिस्थितीत ही मंडळी सुमारे वीस दिवस एक कुटुंब म्हणून राहतात. विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरीची वाट चालतात. तीही विनातक्रार...


आषाढी वारीसाठी उभा महाराष्ट्र पंढरीची वाट चालू लागलाय. माऊलींची आणि तुकोबारायांची पालखी शुक्रवारी, सत्तावीस जूनला पुणे मुक्कामी दाखल झालीय. या दोन्ही पालख्यांसमवेत पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाला भेटायला निघालेल्या हजारो वारकऱयांचं पुणेकरांनी भक्तीभावानं स्वागत केलंय. शहरभर त्यांच्यासाठी अन्नदानाचा उपक्रम राबवलाय.

पिठलं-भाकरीपासून ते बासुंदीपर्यंतचे बेत वारकऱयांसाठी आखले गेले. दोन दिवसांच्या मुक्कामामुळं वारकऱयांना आजचा, शनिवारचा दिवस दिंडीसाठी लागणाऱया चीज-वस्तूंच्या खरेदीत घालवला. तुळशीबाग, लक्ष्मीरोड, नाना पेठ, भवानी पेठ, रास्ता पेठ, सोमवार पेठ, बुधवार पेठे, शुक्रवार पेठ या ठिकाणी वारकऱयांचे जथ्थेच्या जथ्थे फिरत होते. राहूट्या, शाळा आणि मोकळ्या जागांवर दिंड्यांनी मुक्काम ठोकलाय. दुपारच्या खमंग जेवणानंतर भुरभूर पावसातही वारकऱयांनी आडोसा शोधून निवांत विश्रांती घेतली.

अवघाचि संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तिही लोक
जाईन गे माये तया पंढरपुरा
भेटेन माहेरा आपुलिया
पंढरीची आस प्रत्येक वारकऱयाच्या उरी असते. विठ्ठलाच्या भेटासाठी कित्येक मैल वाट तुडवत वारकरी आळंदी-देहूत दाखल होतो आणि टाळ-मृदंग, हरिनामाच्या गजरात हा अपूर्व सोहळा आनंदाने पंढरीची वाट धरू लागतो. दरवर्षी न चुकता, कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी या सोहळ्यात रंगून जातात. काय असते ही उर्जा? कसा असतो नेमका हा भक्तीभाव? परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ घालत ही वारी चालते तरी कशी?...

आजपासून या ब्लॉगवर आपण चालू पंढरीच्या वाटेवर. ई सकाळसाठी शंकर टेमघरे हा ब्लॉग चालवणार आहेत आणि या वाटेवरील प्रत्येक पाऊल वारकऱयांच्या वैशिष्ट्यांसह आपल्यापर्यंत पोहचविणार आहेत. अर्थातच तुम्हाला वारीविषयक वाटलेल्या प्रत्येक भावनेचं इथं स्वागत आहे.


 

Sakaal Media Group, Pune, India