आळंदी ते पंढरपूर या वारीच्या वाटेवर रिंगणातील आनंद काही औरच. रिंगणाला कोणी पूजा म्हणतात, तर कोणी खेळ. वारकऱ्यांच्या दृष्टिने तो असतो, केवळ एक आनंदसोहळा. सोहळ्यात दोन अश्‍व असतात. एक स्वाराचा आणि एक माऊलींचा. स्वाराच्या अश्‍वावर जरीपटक्‍याचा ध्वज घेतलेला श्रीमंत शितोळे सरकारांचा स्वार असतो. तर माऊलींच्या अश्‍वावर गादी असते. त्यावर माऊली विराजमान असते, अशी वारकऱ्यांची भावना असते. त्यामुळे या मार्गावर जेवढी गर्दी माऊलींच्या पादुकांच्या दर्शनाला होते, तेवढीच गर्दी या अश्‍वांच्या दर्शनाला. रिंगणात अश्‍वांवरील माऊलीला अनुभविण्यासाठी एकच गर्दी झालेली असते. वारीच्या वाटेवर दोन उभी आणि चार गोल रिंगणे होतात.

पहिले उभे रिंगण लोणंदजवळील चांदोबाच्या लिंबाजवळ असते. मंदिराजवळ माऊलींचा रथ थांबतो. अग्रभागी दोन्ही अश्‍व त्यानंतर रथापुढे २७ आणि त्यानंतर रथ आणि रथामागे २५० दिंड्या अशी सोहळ्यातील रचना असते. सोहळ्याचे नियंत्रण म्हणून असणारे परंपरागत चोपदार रिंगण लावतात. रिंगण लावतात, म्हणजे दिंड्यांमध्ये अश्‍वाला धावण्यासाठी पुरेशी जागा करुन घेतात. ही सारी प्रक्रिया अवघ्या पाच एक मिनिटात होते. त्यानंतर सुरू होतो, मुख्य सोहळा. यावेळी वारकऱ्यांमध्ये टाळ- मृदंगाच्या गजरात "ज्ञानोबा- माऊली' असे भजन सुरू असते. त्यावर वारकरी नाचत असतात. या दमदार ठेक्‍यात रिं गण पाहण्यासाठी आलेले भाविकही दंग होतात. रिंगणात माऊली आपल्याबरोबर खेळते, अशी वारकऱ्यांची भावना असते. त्यामुळे एवढ्या गर्दीतही रिंगण लावण्याच्या प्रक्रियेस वेळ लागत नाही. दिंड्यांमधील वारकऱ्यांच्या मागे रिंगण पाहण्यासाठी आलेल्या परिसरातील भाविकांची गर्दी उसळलेली असते. सर्वांनाच आस असते, ती माऊलींच्या अश्‍वाच्या धावण्याची. काही मिनिटांत चोपदार माऊलींच्या अश्‍वाला रिंगण दाखवितात. सोबत स्वाराचा अश्‍व असतोच. अग्रभागी असणारे दोन्ही अश्‍व बेफाम दौंडत रथाजवळ येऊन रथामागील वीस दिंड्यांपर्यंत जातात. व पुन्हा माघारी फिरून रथाजवळ येतात. त्यांची रथाजवळ पूजा करुन त्यांना प्रसाद दिला जातो. व त्यांना पुन्हा रथापुढील २७ दिंड्यांमध्ये अश्‍वांना सोडण्यात येते. भरधाव वेगात दोन्ही अश्‍व एकमेंकांशी स्पर्धा करीत अग्रभागी जातात. कधी स्वाराचा तर कधी माऊलींचा अश्‍व पुढे- मागे धावतात. हाच क्षण भाविकांना अनुभवायचा असतो. त्यानंतर माऊलीच्या अश्‍वाच्या पायाखालची धूळ (माती) कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. त्यानंतर चोपदार रथावर चढून चांदीचा चोप उंचावतात. चोप उंचावला रे उंचावला की, जोपर्यंत वारकऱ्या
ंना तो दिसतो, तिथपर्यंत वारकऱ्यांमधील टाळमृदंगांचा गजर आणि भजन थांबते. साऱ्या परिसरात पसरते ती केवळ शांतता. त्यानंतर आरती होऊन चोप गोल फिरवून चोपदार उडी मारतो, यालाच उडीचा कार्यक्रम म्हणतात. उडीनंतर रिंगण सोहळा संपतो. अन्‌त्या सोहळा चालू लागतो. रंगलेल्या रिंगणानंतर दिंड्यांमध्ये फुगड्या, खो-खो, हुतूतू, कोंबडा, वारकरी पावक्‍या असे विविध खेळ रंगतात. वारकरी वय विसरून नाचतात. आयुष्यात कधी न नाचलेला वयोवृद्धही वारीच्या वाटेवर "माऊली'नामात दंग होतो, अ्‌न देहभान विसरून नाचतो. होय, यालाच तर म्हणतात.... आनंदसोहळा.

शनिवारी सारं काही असंच झालं. तोच सोहळा, तेच वारकरी, तिच माऊली अन्‌ तोच उत्साह. रणरणत्या उन्हात माऊलीचा रथ चांदोबाच्या लिंबाजवळ आला. दुपारी सव्वाचारला रिंगण सुरू झालं. बाळासाहेब चोपदार, राजभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब आरफळकर यांनी रिंगण लावून घेतलं. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा- माऊलींच्या जयघोषाने अवघे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालं होतं. बेफाम वेगात दोन्ही अश्‍व रिंगणात धावले. माऊली- माऊली असा जयघोष झाला. अन्‌ माऊलींच्या अश्‍वाने घेतलेली बेफाम दौड लाखो भाविकांनी डोळ्यात साठवली. अश्‍वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. त्यानंतर बाळासाहेब चोपदार यांनी रथावर चढून मानाचा चोप उं चावला. अन्‌ परिसरात शांतता पसरली. त्यानंतर आरती झाली. आणि दिड्यांमध्ये खेळ रंगले. सारं काही वातावरण दरवर्षीप्र माणे होतं. माऊलींच्या अश्‍व रिंगणात बेफाम धावल्याने वारकऱ्यांत चैतन्य संचारले होते. माऊली आमच्यात खेळली, हीच भावना उराशी बाळगून सोहळा तरडगावात मुक्कामी विसावला.

यावेळी किसनमहाराज साखरे भेटले. त्यांच्याशी रिंगणाबाबत विषय काढला. त्यावेळी ते म्हणाले,"" रिंगण म्हणजे प्रदक्षिणा. देवाच्या उपचारामध्ये सोळा उपचार आहेत. त्याला षोड्‌पचार असे म्हणतात. या उपचारामध्ये पंचामृत स्नान, धूप, दीप, नै वेद्य, अभिषकासाठी पुरुषसुक्त आणि रुद्र असे अभिषेक आहेत. एक अभिषेकापूर्वीची पूजा व दुसरी अभिषेकानंतरची पूजा. या पूजांना उत्तरपूजा व पूर्वपूजा म्हटली जाते. या उपचारामध्ये देवाला प्रदक्षिणा घालणे हा एक उपचार आहे. जेथे मंदिर नसते. अशा ठिकाणी पूजा करणारा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतो. म्हणजेच प्रदक्षिणा हा वारकरी संप्रदायामध्ये एक महत्त्वाचा उपचार आहे. हे प्रदक्षिणा तत्त्व लक्षात घेऊन संत ज्ञानेश्‍वर महाराजांना मध्यभागी घेऊन माऊलींभोवती जेव्हा एखाद्या स्थानावर प्रदक्षिणा करतात. ती गोल प्रदक्षिणा हो आणि माऊलीला मध्यस्थी ठेवून घालण्यात येणाऱ्या प्रदक्षिणेला उभे रिंगण म्हणतात. रिंगण म्हणजे प्रदक्षिणा, परिक्रमा होय. पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळ्याने वारकऱ्यामध्ये भक्ती, प्रीती व चै तन्य निर्माण होते आणि तो उत्साहाने वाटचाल करते.''
- शंकर टेमघरे

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India