बिन विषयांची बैठक
माऊलींची पालखी दुपारी एकला निघणार होती. मात्र, काल समाजआरतीत चोपदारांनी भंडीशेगाव तळावर दिंडी संघटनेची बैठक जाहीर करण्यात आली होती. सकाळी नऊला बैठक असल्यानं आम्ही शितोळे सरकारांच्या पालावर पोहोचलो. लोणंदला बैठक न झाल्यानं आज बैठकीत काय होणार यांची आम्हाला उत्सुकता होती. त्यावेळी शेडगे पंच मंडळीच्या दिंडीतील आम्हाला बोलावलं. आम्हाला वाटलं काय तरी बातमीचा विषय असणार म्हणून. पण तेथे गेल्यावर सर्वांच्या समोर आली कांदे भजी. आज काय विशेष वाचारलं. तर त्यांनी सांगितलं, आज कांदेनवमी आहे. त्यामुळे तळावरील बहुतांश दिंड्यांमध्ये सकाळच्या न्याहरीला कांदे भजी करतात. गरम गरम भजी खाऊन आम्ही दिंडी संघटनेच्या बैठकीला बसलो. शितोळे सरकारांच्या पालावर बैठक घेण्याची परंपरा असल्यानं दिंडीकरी मालक बरोबर नऊपासूनच पालासमोर बसले होते. साडेनऊच्या सुमारास मालक राजाभाऊ आरफळकर, विवेकानंद वासकर, राजाभाऊ चोपदार, सोहळाप्रमुख सुधीर पिंपळे आले अन्‌ बैठक सुरू करण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीचे विषय काय, सचिवांना विचारण्यात आलं, ही बिनविषयाची बैठक आहे. सोहळ्याबाबत काय सुचना असतील त्या कराव्यात, वासकर म्हणाले. त्यावर नारायण पवार यांनी आळंदीतील देऊळवाड्याच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी भाऊ हरपळे यांनी माऊलींच्या सोहळ्याला लागून चालणाऱ्या अन्य पालख्याबाबत आक्षेप घेतला व त्यांच्या स्पिकरसह होणाऱ्या भजनाने दिंडीतील भजनात व्यत्यय येत असल्याच सांगितलं. त्यावेळी अनेक दिंडीकऱ्यांना त्याला अनुमोदन दिले. अन्‌ ठराव करण्यात आला. या पालख्या माऊलींच्या रथाच्या मागे पाच किलोमीटर मागे चालवाव्यात. त्यानंतर बेशिस्त दिंडीकरयांविषयी चर्चा सुरू झाली. सोहळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वानी परंपरेप्रमाणे वागावे, यापुढील काळात बेशिस्त दिंड्यावर क
ारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच दिंड्यामध्ये राजकीय पक्षांच्या प्रचाराचा शिरकाव वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाचे "फ्लॅक्‍स'वर तसेच वाहनांवरील फलकांवर कोणत्याही पक्षाच्या चिन्हाचा तसेच दिंडीतील महाराजांचा फोटो असणार नाही. तर संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम महाराजांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचेही छायाचित्र लावायचे नाही, असाही ठराव करण्यात आला. यावेळी महाराजांमधील मतभेद बघायला मिळाले. काहीचे म्हणणे होते. काही महाराज मंडळी भिसी गोळा करून केवळ पंधरा दिवसांसाठी दिंडी काढतात. पैसे कमावण्यासाठी करण्यात आलेल्या दिंड्यांवर निर्बंध टाकावेत, तसेच त्यांना काही निकष लावावेत. नव्या महाराज मंडळींमुळे पिढ्यानपिढ्या परंपरा जपणाऱ्यांवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे शिस्त न पाळणाऱ्या दिंड्यावर कारवाई करण्याचं ठरलं. तसेच वारीच्या वाटेवर चालत कोणीही तंबाकू, गुटखा खाऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आली. अन्नदान करणाऱ्यांवर या बैठकीत झोड उठविण्यात आली. अन्नदान करणाऱ्यांमुळे सोहळ्याच्या पुढे मोकाट समाज चालतो, त्यामुळे पुढील तळावर तसेच परिसरात त्यांच्याकडून घाण केली जाते. त्यामुळे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दिंड्या गेल्यानंतर अन्नदान करावे, असे सूचविण्यात आलं. मात्र, त्यावर अंकुश ठेवणे शक्‍य होणार नसल्याचे सांगण्यात आले. स्पिकरबाबत सर्व वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये प्रामुख्याने आळंदी ते पुणे या वाटचालीत मोठ्या प्रमाणात विविध पक्ष संघटना, संस्था वारकऱ्यांना अन्नदान करतात. मात्र, मोठ्या आवाजात स्पिकर लावतात. त्यामुळे दिंड्यांमध्ये शिस्तबद्ध चालणाऱ्या वारकऱ्यांच्या भजनात व्यत्यय येतो. त्यामुळे त्याबाबत काही तरी उपाययोजना करण्याबाबत ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय झाला. पुण्यात होणाऱ्या स्वागत तसेच अन्नदानाबाबत वारकरी स
माजाला पूर्ण आदर आहे. मात्र, स्पिकरच्या आवाजामुळे भजनाचा आनंद घेता येत नाही. त्यांनी आवाज कमी ठेवल्यास किंवा न लावताच स्वागत केले. तर आम्हाल आणखी आनंद वाटेल, असं सांगण्यात आलं. अशा विविध चर्चा यावेळी झाली. त्यामध्ये महाराजांमधील मतभेदापासून ते ज्ञानेश्‍वर महाराजांच्या सोहळ्याचे वैभव राखण्यासाठी घ्यावयच्या काळजीपर्यंतच्या चर्चा झाल्या. कोणत्या ना कोणत्या विषयांने नेहमी वादग्रस्त होणारी ही बैठक आज अगदीच खेळीमेळीच्या वातावरणात झाली. वादावादीचे मुद्दे उपस्थित होत असणाऱ्या या बैठकीत आज पत्रकारांना काहीच मिळालं नव्हते.
-शंकर टेमघरे

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India