माऊली नामात विदेशीही दंग !

पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी उभा महाराष्ट्र वारीची वाट चालतोय. कोणतेही निमंत्रण नसताना विठुचरणी लीन होण्यासाठी ही मांदियाळी या वाटेवर एकवटलीय. या सोहळ्याचा महिमा आता सातासमुद्रापार गेलाय. यंदाच्या पालखी सोहळ्यात इंग्लडमधील इनेसा वाईचुयी आणि बॅरिंग्टन डी ला रोची हे दिंडी क्रमांक चारमध्ये वारीत चालताहेत. इनेसा कलाकार असून बॅरिंग्टन संपादन तसेच दिगदर्शनाचे काम करीत आहेत. त्यांच्याशी बोलायचं ठरवलं, शनिवारी त्यांना गाठलं. तुम्हाला पंढरीच्या वारीबाबत माहिती कशी मिळाली, त्यावर बॅरिंग्टन म्हणाला, ""लंडनमध्ये आम्ही राहतो, तेथील वसंतराव चाफेकर हे आमचे मित्र. आम्ही त्यांना भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासंदर्भांत बोललो, त्यावेळी त्यांनी आम्हाला पंढरपूर वारीचा संदर्भ दिला. त्यानंतर आम्ही भारतात येऊन आळंदी, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यावेळी वारीबाबतची सर्व माहिती घेतली. आणि त्यावर माहितीपट करण्याचा निर्णय घेतला. यंदा वारीत चालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वर्षभर अगोदर आम्ही इंग्लडमध्ये चालण्याचा सराव केला. यंदा आळंदीपासून वारीत सहभागी झालोय. वारीत चालताना भाषेची अडचण येवू नये, म्हणून सांगलीतील दुभाषी नेमलाय. याच्या माध्यमातून मुलाखती तसेच भौगोलिक माहिती तो आम्हाला चित्रीकरणापूर्वी पुरवितो.

वारीविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, एवढा रोमांचक अनुभव आजपर्यंत पाहावयास मिळाला नाही. कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ भगवंताच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने लोक मैलो न्‌‌‌ मैल पायपीट करताना दिसताहेत. निसर्गाची चिंता न करता लोक सहभागी होत आहेत. असा अनुभव आम्हाला जीवनात प्रथमच पाहावयास मिळाला. दोन लाख लोक एकाच वेळी चालतात, त्यांना थकवा जाणवत नाही, ही प्रेरणा येते तरी कुठून? वारकऱ्यांच्या या नित्याच्या सवयीचाही आम्ही अभ्यास करीत आहोत.

वारीत काय अडचण जाणवते, असे विचारले असता, तो म्हणाला, कॅमेऱ्याची बॅग पाठीवर घेऊन चालताना काहीसा त्रास होतोय. आणि धुळीमुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवतोय.

तुम्ही वारीतून काय शिकलात? या प्रश्‍नावर बॅरिग्टन तातडीने उत्तरला, ऍडजेस्टमेंट. इंग्लडमध्ये माझं घर "एसी' आहे. अशा वातावरणात राहत असताना आम्ही वारीत सर्व काही "ओपन' वावरतोय. आणि हो, वारी आणखी एक शिकलो, "ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली'.''

वारीबाबत काय सुधारणा व्हावी, असे आपण्यास वाटतं असं विचारलं असता, तो हात जोडून म्हणाला, ""एवढ्या मोठ्या सोहळ्याबाबत सुधारणा सूचविण्याएवढा मी मोठा नाही. आमच्याकडं पाच- दहा जणांना ग्रुपने नियोजन केल्याशिवाय वावरता येत नाही. त्याउलट कोणत्याही प्रकारची शासकीय यंत्रणा नसताना लाखो भाविक एकत्र वीस दिवस एकत्र चालतात, राहतात. हा आमच्या दृष्टिने एक चमत्कारच आहे.

वारीविषयी त्यांना विचारले असता,"दोन लाख लोक एकाचवेळी चालतात याची प्ररणा कोठून येते, त्यांना थकवा जाणवत नाही, वारकऱ्यांच्या या नित्याच्या सवयीचा हे दोघे सध्या अभ्यास करीत आहेत.'

पंढरीची वारी हा एक अविष्कार आहे, हे केवळ आपल्यालाच वाटते, हा माझा समज दूर झालाय. जो या वाटेने चालतो, त्याला तो अनुभव आल्याशिवाय राहत नाही, हे मात्र निश्‍चित...

- शंकर टेमघरे

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India