आळंदी ते पंढरपूर या दरम्यान माऊलींच्या पालखीची दुपारी आरती होणारं वाल्हे हे एकमेव गाव. समाजआरती म्हणजे काय? ही का केली जाते? याबाबत थोडसं सांगावं वाटतं.

पालखी सोहळ्याचे संस्थापक हैबतबाबा आरफळकर (साधारण 1832 चा काळ) हे कडक शिस्तीचे होते. त्यांची शिस्त सोहळ्यात पुरेपूर उतरली. त्यामध्ये निघण्याची वेळ, विसावा, मुक्कामाची ठिकाणे आणि समाजआरती यांचा प्रामुख्यानं समावेश असतो. समाजआरतीला वारीत मानाचं स्थान आहे. दिवसभराची वाटचाल संपून मुक्कामाच्या ठिकाणी देवाच्या तंबूसमोर पालखी आणण्यात येते. त्यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमतात. गोलाकार दिंड्या ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करीत असतात. गर्दीतून वाट काढीत पालखी मध्यभागी येते. दरम्यानच्या काळात भजनाचा सूर टिपेला पोहोचलेला असतो. तेवढ्यात चांदीचा चोप उंचावतो आणि चोपदार हो हो हो अशी आरोळी ठोकतो.

चोप उंचावला रे उंचावला की क्षणार्धात टाळ-मृदंगाचा गजर बंद होतो. मात्र, त्यानंतरही टाळ-भजन सुरू राहिल्यास संबंधित दिंडीची काही तक्रार आहे, असे समजले जाते. दिवसभराच्या वाटचालीत अथवा मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित दिंडीला अडचणी आल्या, तर अशा पद्धतीने टाळ वाजवून तक्रार नोंदविण्याची समाजआरतीत प्रथा आहे. अशी पद्धत बहुधा फक्त वारीतच अनुभवाला येते. त्यानंतर संबंधित दिंडीची अडचण समजावून घेण्यासाठी चोपदार त्या दिंडीजवळ जातात. त्यांची अडचण समजावून घेतल्यानंतर त्यांचे टाळ थांबतात. हा सर्व आवाज बंद झाल्यानंतर हरविलेल्या वस्तूंची यादी वाचण्यात येते. सापडलेल्या वस्तुंचीही यादी वाचली जाते. ओळख पटवून देवाच्या तंबूजवळून या वस्तू घेऊन जाव्यात, अशी सूचना केली जाते. त्यामध्ये ओळखपत्रापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंतच्या चीज-वस्तूंचा समावेश असतो. हे सर्व झाल्यानंतर दिवसभराच्या वाटचालीत दिंड्यांमधील वारकऱयांनी पाळावयाचे नियम सांगण्यात येतात. प्रसंगी कारवाईचा इशाराही दिला जातो. त्यानंतर दुसऱया दिवशीची निघण्याची वेळ जाहीर करण्यात येते. आरती होऊन पालखी तंबूत विसावते.

शिस्तीच्या या प्रक्रियेला समाजआरती म्हणतात. दरवर्षी ठरल्याप्रमाणं प्रत्येक मुक्कामाला ही समाजआरती होते. समाजआरती झाल्याशिवाय दिंडीत चालणारा वारकरी खाली बसत नाही.

बुधवारी वाल्हेत अशीच समाजआरती झाली. केवळ एका नव्या गोष्टीचा समावेश त्यात झाला. तो तेथील तळ नवा होता. वारीच्या सोहळ्याच्या संख्येमुळे देवस्थान आणि मानकऱयांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाबाहेर मोकळ्या जागेत यंदा तळ हलविला आहे. आता तीस एकरावर माऊलींचा तळ सजला आहे.
- शंकर टेमघरे

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India