शकुरची वारी
मंगळवारी सकाळच्या वाटचालीत दिंड्यामधून अंभग सुरू झाले होते. हो, अभंगावरून एक आठवलं, राज्याच्या जवळपास सगळ्या भागातून वारीच्या वार्तांकनासाठी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे पत्रकार, छायाचित्रकार वारकरीच झालेले असतात. आम्ही सर्वांनी मिळून पालखी सोहळा पत्रकार संघही स्थापन केलाय. आमच्या या पत्रकार दिंडीबाबत आपण नंतर विस्ताराने बोलू...

सांगायची गोष्ट आहे, ती सोलापूरच्या शकुर तांबोळीची. तो छायाचित्रकार. तीन वर्षांपूर्वी पालखी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे यांनी आळंदीत शकुरशी ओळख करुन दिली. क्षणभर मला प्रश्‍न पडला, "हा मुस्लिम मुलगा. वारीच्या वाटेवर चालणार का?' ही शंका अगदी पहिल्याच झटक्‍यात शकुरनं दूर केली, त्याच्या स्वभावानं आणि आत्मियतेनं. वारीत चालताना एखाद्या फोटोसाठी धावपळ करण्याची वेळ आल्यास शकूर अगदी प्रेमानं "माऊली- माऊली' म्हणतं वारकऱ्यांमधून वाट काढायचा. पाच- सहा दिवस चालल्यानंतर शकूरशी चांगली मैत्री झाली. शकूरला माऊलींबद्दल, या एकूण सोहळ्याबद्दल काय वाटतंय, याची मला उत्सुकता होती. त्याच्याच तोंडातून त्याच्या भावना ऐकायच्या होत्या. पण जीभ रेटेना. त्याला थेट विचारलं, तर काय वाटेल?....माझ्या बोलण्याचा त्याला राग तर येणार नाही ना? असे अनेक प्रश्‍न मनात घोळत होते.

आठवडाभराचा अवधी गेला. वारी अंतिम टप्प्यात असताना आमचा मुक्काम अकलूजला होता. त्यावेळी सर्व सहकारी बातम्या फॅक्‍स करायला गेले होते. शकूर आणि मी विश्रामगृहावर होतो. या विषयावर बोलायचंच, असं मी ठरवलं. त्याला म्हणालो, "काय हा वारीचा सोहळा आहे...सगळी जण वय, जात, भेद विसरून चालतात...'. त्यावर तो म्हणाला, "शंकरराव, हे जग अजबच आहे.' मात्र, त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं. अखेर मी त्याला मला हवा असणारा प्रश्‍न केला. "शकूर तुला वारीला यावसं का वाटलं?'

त्यावर तो म्हणाला, "मी पंढरपूरच्या अनाथाश्रमात शिकलो. त्यावेळी वारकरी मंडळी पंढरपूरला यायची. त्यांच्याबद्दल मला कमालीचा आदर वाटायचा. आपल्याला वारीत सहभागी होता येईल का? अशी मनोमन इच्छा व्हायची. सुफीपंथांच्या आमच्या गुरुंनी आम्हाला सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली होती. धर्म, जात- पात कोणता देव ठरवत नाही, तर आपण ठरवतो, ही ती शिकवण होती. तोच विचार माझ्या मनात होता. पुढे अकलूजला आल्यानंतर फोटोग्राफीच्या व्यवसायात काम करु लागलो. एका वर्तमानपत्राने मला वारीचे फोटो काढण्यासाठी जाणार का? अशी विचारणा केली. त्यावेळी मला सर्वाधिक आनंद झाला होता. त्याक्षणी मी "होय' म्हणून सांगितलं. त्यानंतर दरवर्षी मी वारीत चालतो. त्यातून मला अनेक चांगले अनुभव आले. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. वारीत आपल्याकडून दररोज वीस-बावीस किलोमीटर चालणं होतं. दिंडीत अभंग म्हणत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सहवासाचा आनंद मिळतो.'

हाच शकूर यंदाही वारीत चालतोय. आणि चालताना वारकऱ्यांबरोबर अभंगही गुणगणतोय. जातीभेदाच्या भिंतीपार हा आनंदसोहळा आहे, हे त्या अभंगातून पावलोपावली जाणवतोय...

- शंकर टेमघरे

1 comments:

  1. Anonymous said...

    This Experiance of your for One Muslim Photographer Walk with Wari upto Pandharpur is very good for all muslims which live in India but his soul in Pakistan. Kindly you will give this news in Flash Lite in Sakal Newspaper.
    Yours
    Manmohan Kasat  


 

Sakaal Media Group, Pune, India