बुधवारी पालखीचा मुक्काम वाल्ह्यात होता. पालखी तळावर सोडून आम्ही सर्व पत्रकार बातम्या पाठविण्यासाठी जेजूरीला आलो. बातम्या पाठविल्यानंतर मुक्कामेला निरेला जायचे, असा निर्णय झाला. निरेला विश्रामगृहावर जेवत असताना, आमच्या एका वरिष्ठ बातमीदाराला तहसीलदारांचा मोबाईल आला.
मुख्यमंत्र्यांच्या मिसेस उद्या वाल्ह्यात पहाटपुजेला येणार असून त्या वारीतही चालणार आहेत.

एका नव्या पत्रकाराने ऑफिसला फोन करून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी वारीत चालणार, अशी बातमीही सांगितली. त्या वर्तमानपत्रात बातमी येणार म्हटल्यावर सर्वांनीच जोड म्हणून सर्वच पत्रकारांनी ही दिली. आम्ही सोहळ्याच्या पुढे आल्याने पहाटे वार्तांकनाला कसे जायचे, याबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर एका अनुभवी बातमीदाराने असा पर्याय काढला की, आपल्यातील छायाचित्रकार आणि चॅनेलचे कॅमेरामननी वाल्हात मुक्कामाला जावे. कारण सकाळी निरेतून वाल्ह्याला जाणे होणार नव्हते. आता प्रश्‍न होता वाल्ह्याच्या मुक्कामाचा. कारण वाल्ह्यामध्ये विश्रामगृह नव्हते. त्यामुळे तंबुत झोपावे लागणार होते. आम्ही सोहळा प्रमुखांना फोन करून चार सहकाऱयांसाठी जागा ठेवण्याचा निरोप दिला. चौघेजण गेले. जेजूरी ते वाल्हे हा आठ-नऊ किलोमीटरचा टप्पा चालल्याने सर्वजण थकलेले होते.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी वारीत चालण्याचा फोटो मिळविण्यासाठी छायाचित्रकरांना जाण्याशिवायही पर्याय नव्हता. विशेष म्हणजे, जाणारे चौघेही नवीन होते. त्यांना तंबूत राहण्यासंबंधी माहिती नव्हती. जवळ कॅमेरेसारख्या मौल्यवान वस्तू होत्या. रात्री साडेअकराच्या सुमारास मंडळी वाल्ह्याला रवाना झाली. सकाळी साडे सहाच्या दरम्यान एका छायाचित्रकाराचा फोन आला, की मॅडम येण्याचे रद्द झाले आहे.
त्यानंतर मी सोहळाप्रमुखांना फोन केला. त्यांनी मला असे सांगितेले की, पोलिसांचा आत्ताच फोन आलाय सौ. देशमुख जेजूरी पास झाल्या आहेत. आम्ही तातडीने छायाचित्रकार आणि अन्य सहकाऱ्यांना रथाजवळ थांबायला सांगितले. त्यानंतर तासाभराच्या अंतराने आम्हाला पोलिसांचा फोन आला की व्हीआयपी ताफ्यातन सौ. देशमुख आल्यात. पण त्या विलासराव देशमुखांच्या पत्नी नाहीत.
त्यानंतर आम्ही पुन्हा फोन केलेत आणि माहिती काढली. कारण गाडीतून उतरेपर्यंत पोलिस, महसूल विभाग, देवस्थान या सर्वांना विलासराव देशमुखांच्या पत्नी येणार अशी सुचना होती. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी येणार म्हणून पंधरा मिनिटे सोहळा थांबूनही ठेवला होता.

सकाळी सव्वा सातच्या दरम्यान ताफा आला. पोलिसांनी खातरजमा केली, तेव्हा त्या विलासराव देशमुख यांच्या पत्नी नसून मुख्यमंत्र्यांचे बंधू आमदार दिलीप देशमुख यांच्या पत्नी सौ. सुवर्णादेवी देशमुख असल्याचं समजलं.

तिथे पोहचलेल्या नव्या छायाचित्रकारांना विलासराव देशमुखांच्या पत्नी माहित नसल्याने त्यांनी शुटींग, फोटो, घेतले. चॅनेलच्या पत्रकाराने तर त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी नकार दिला. या साऱया गोंधळाने वारकरी, महसूल प्रशासन, पोलिस यंत्रणा, देवस्थान आणि पत्रकार या साऱ्यांचेच हाल झाले.

वारकऱ्यांमधून या ताफ्याला वाट काढताना पोलिसांची दमछाक झाली. महसूल खाते रात्रभर जागे होते. रात्री एक वाजता तंबूत झोपलेल्या पत्रकारांना पहाटे साडेतीनला उठावे लागले होते.

मोहिमेवर पाठविलेले चौघेजण आम्हाला निरेत भेटले. प्रचंड त्रासलेल्या अवस्थेत त्यांनी तिथल्या घडामोडींचे फोटो दाखवले !

प्रश्न असा आहे, की एका आमदाराच्या पत्नीसाठी एवढा फौजफाटा कशासाठी ? लाखो वारकरी पायी चालत विठूरायाच्या दर्शनाला जातात. बुधवारी समाजआरतीच्या वेळेत मिनिटभराचाही उशीर झालेला नव्हता. मग, गुरुवारी वारकऱयांना तिष्ठत ठेवणे किती योग्य होते ?

वारीत गेल्या तीन-चार वर्षांपासून पत्रकारांना रेस्ट हाऊस, इंटरनेट, फॅक्स या सुविधा सहज उपलब्ध होऊ लागल्यानं अशा पद्धतीची धावपळ खूप कमी झाली आहे.

बऱयाच काळानं अशी धावपळ झाली सगळ्यांची !

संतानाना चोपदार यांच्याशी हा विषय निघाला, तेव्हा ते म्हणाले, वारीत चालणारा प्रत्येक जण वारकरी असतो. माऊलींपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. यासाठी सोहळ्याला वेठीस धरणं योग्य नाही. या मंडळींच्या वारीत चालण्यानं अनेक अडचणी येतात. वारकऱयांना त्रास होतो. याची जाणिव या मंडळींना व्हायला हवी. किंवा फौजफाटा न घेता, इथं यायला हवं.

एक माहिती सांगण्यासारखी आहे. मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी गेल्या सहा-सात वर्षांपासून वारीत चालतात. दिंडीत सकाळी सहापासून संध्याकाळी सहापर्यंत असतात. कधीही त्यांनी व्हिआयपी असल्याचं मिरवलेलं नाही. पाडेगावच्या दुपारच्या जेवणात, एका सहकाऱयानं त्यांना विचारलं, की तुम्ही का नाही व्हिआयपीची सुविधा घेत?

पाचपुतेंच्या पत्नींचं उत्तर होतं, मी माऊलीसाठी चालते...

संध्याकाळी माऊलींची वारी लोणंद मुक्कामी पोहोचली आहे...

- शंकर टेमघरे

5 comments:

  1. sanjay said...

    anand denari pandharichi wari  

  2. Atul Kumthekar said...

    सुंदर लेख  

  3. Anonymous said...

    very nice article  

  4. Unknown said...

    vari sambandhi tazya batmya purvilya baddal sakal la dhanyavaad  

  5. Unknown said...

    Vaari mhanaje maharashtracha praan... ithe Britain madhe asunahi vaarichya fakta vaachanaane manala kevadhatari aanand dila... Sakaal la manahpurvak dhanyavaad....  


 

Sakaal Media Group, Pune, India