रिंगणापेक्षा उडीचा खेळ रंगला
शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्याने वेळापूर सोडलं. आम्ही सोहळ्याबरोबर ठाकूरबुवाच्या समाधी मंदिराजवळ रिंगणाच्या ठिकाणी पोहोचलो. येथील काळ्याभोर शेतात हे रिंगण होणार होतं. दोन्ही बाजूंना उसाचं पीक आणि हे शेत मात्र तसंच होत. त्यावेळी मी विचारलं. हे शेत रिंगणासाठी आरक्षित केलं आहे का? माझ्या या प्रश्‍नाने एका ग्रामस्थाने सांगितले. ""आरक्षण बिरक्षण काही नाय, हे खासगी शेत हाय. हा शेतकरी माऊली आपल्या शेतात येतीय, वारकऱ्यांसोबतीनं खेळतीय म्हणून वारी पुढं गेल्यावर तो शेतकरी पेरणी करतोया. माऊलींच्या पाहुणी येतेय, म्हणून तो हा हंगाम सोडून देतोया. अन्‌ हो दुसऱ्या दोन हंगामात त्याला बक्‍कळ फायदा होतुया.''

त्याच्याशी गप्पा मारताना रिंगण कधी सुरू झालं मला कळलंही नाही. सदाशिवनगर आणि खुडूस फाट्यावरील रिंगणात अश्‍वांचा अनुभव पाहता, मी रिंगण बाहेरूनच पाहण्याचा निर्णय घेतला. अश्‍वांनी काही क्षणात चार फेऱ्या मारल्या. अन्‌ रिंगण मोडलं. सर्वच रिंगणामध्ये दिंड्यांमधील खेळ बघून झालं होते. त्यामुळं मी माझा मोर्चा उडीच्या कार्यक्रमाकडं वळवला. तोपर्यंत दिंड्यांमधील टाळकरी, पखवाजवादक अगदी तयारीतंच आले होते. मालक राजभाऊ आरफळकर, संतांनाना चोपदार, राजाभाऊ चोपदार यांच्या इशाऱ्यावर उडीचा खेळ सुरू झाला. उडीचा खेळ म्हणजे माऊलींच्या पालखी शेजारी पुन्हा वारकऱ्यांचे खेळ. पण इथे जुंगलबंदी बघायला मिळते. पाच सहाशे टाळकरी आणि पन्नासएक पखवाजवादक होते. विलंबित तालात "ज्ञानोबा- माऊली' भजन सुरू झालं. मालक, चोपदार हाताच्या इशाऱ्याने टाळकरी आणि पखवाजवादक यांना ताल धरायला लावत होते. पाच- सात मिनिटे झाली, पण टाळांचा आणि पखवाजवादकांचा सूर जुळेना. पखवाजवादक वेगवेगळे बोल वाजत असल्याने टाळाचा आणि पखवाजाचा सूर बिघडत होता. अखेरी झाली, पण भजन, टाळ, आणि पखवाजाचा सूर काय जुळेना. अखेर चिडलेल्या संतानाना चोपदाराने भजन थांबवलं, आणि पखवाज गळ्यात घातलं. अन्य पखवाजवादकांना संतानाने खडसावून सांगितलं, "धिं दा ग धा ग धिं धा ग ता' हाच बोल सर्वाना वाजवायलाय. तो आदेश संतानानाचा असल्याने पखवाजवादकांनी तो वाजवला, आणि भजन रंगत गेलं. त्यानंतर उत्साह एवढा वाढला की, संतानानाने अश्‍व उडीच्या खेळात अश्‍वांना पळविण्यासाठी बोलावून घेतले. माऊली नामाच्या दमदार ठेक्‍यात अश्‍वांना सोडण्यात आले. अश्‍वांनी काही क्षणात पाच फेऱ्या पूर्ण केल्या. या वर्षी गोल रिंगणात अश्‍व पळताना माझं समाधान झालं नव्हतं. मोठ्या रिंगणापेक्षा उडीचा खेळात रमलेले वारकरी आणि अश्‍वांनी मारलेल्या पाच फेऱ्या मनाला आनंद देणाऱयाच ठरल्या.

- शंकर टेमघरे

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India