पंढरीच्या वारीवर माहितीपट काढण्याच्या हेतूने लंडन येथील इनेसा वायचुट आणि बॅरिग्टन डी. ला. रोच हे परदेशी वारकरी दिंडी क्रमांक चारमध्ये चालताहेत. त्यांच्या मनातील रिंगणाविषयी भावना मला जाणून घ्यायची होती. त्यासाठी सोमवारी रिंगणामध्ये मी शेडगे पंच मंडळी दिंडी क्रमांक चारजवळ आलो. ते दोघे दिंडीत होते. त्यांतील बॅरिग्टनने पांढरा कुरता सलवार डोक्‍यात टोपी घातली होती. त्यामुळे तो ओळखू येत नव्हता. इनेसाने आकाशी रंगाचा कुरता सलवार घातला होता. दोघांच्याही हातात कॅमेरे होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकारामांच्या ठेक्‍यात वारकऱ्यांबरोबर दोघांनीही ताल धरला होता. नाचताना दंग झालेल्या या परदेशी वारकऱ्यांच्या उत्साहाला पारावार राहिला नव्हता. नाचता नाचता ते दोघे देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांचेही शुटींग करीत होते. भक्तीचा हा सोहळा कॅमेऱ्यात साठविताना "ज्ञानोबा- माऊली'च्या ठेक्‍यात अक्षरशः नाचत होते. रिंगणाच्या या सोहळ्यात त्यांना कशाचं शुटींग करायचं आणि कशाचं नाही, असं झालं होतं. कारण त्यांना साराच भक्तीभाव कॅमेऱ्यात साठवायचा होता...

- शंकर टेमघरे

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India